वायुसेना प्रमुख चौधरी यांची घोषणा, सी-295 च्या व्यवहारानंतरचा महत्वाचा निर्णय
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारत 100 नवी युद्धविमाने खरेदी करणार आहे. ही विमाने स्वदेशनिर्मित असून ती हिंदुस्थान एरॉनॉटिक्स या कंपनीकडून घेतली जाणार आहेत. ती एलसीए मार्क 1 ए या प्रकारची हलक्या वजनाची पण अत्याधुनिक तेजस विमाने आहेत. नुकतीच भारताने स्पेनकडून सी-295 प्रकारची विमाने घेतली आहेत. या व्यवहारानंतरचा हा व्यवहार सर्वात महत्वाचा मानला जात आहे. या खरेदी योजनेची घोषणा भारतीय वायुदलाचे प्रमुख व्ही. आर. चौधरी यांनी केली. स्वातंत्र्यानंतर भारत प्रामुख्याने रशियन बनावटीच्या मिग विमान मालिकेवर अवलंबून रहात आला आहे. तथापि, आता ही मालिका जुनी झाली असून या मालिकेतील विमाने कालबाह्या होण्याचा मार्गावर आहेत. मिग-21, मिग-23, मिग-25 आणि मिग-27 या जातीची विमाने आता निवृत्त करण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे नवी विमाने खरेदी केली जाणार आहेत.
तेजसची गुणवत्ता उत्कृष्ट
तेजस हे भारत निर्मित हलके युद्ध विमान आहे. त्याची आधुनिक आवृत्ती नुकतीच निर्माण करण्यात आली आहे. मात्र, या विमानाचे इंजिन अमेरिकन बनावटीचे आहे. अमेरिकेच्या जनरल इलेक्ट्रिक कंपनीशी भारताने या इंजिनांची निर्मिती भारतात करण्यासाठी आणि या इंजिनाचे तंत्रज्ञान भारताला हस्तांतरित करण्यासाठी चर्चा चालविली असून लवकरच हा करार होण्याची शक्यता आहे. हे तंत्रज्ञान भारताला मिळाल्यास भारत युद्धविमान निर्मितीत स्वयंपूर्ण होऊ शकतो. भारताने आत्मनिर्भरतेच्या योजनेतून निर्माण केलेले तेजस किंवा मार्क वन ए युद्धविधान उत्कृष्ट गुणवत्तेचे असून भारताने त्याच्या निर्यातीचे करारही केले आहेत. त्यामुळे या विमानाची निवड वायुदलाने केली आहे.
योजना सादर
वायुदलाने नव्या खरेदीची योजना संरक्षण विभागाला सादर केली आहे. वायुदलाला युद्ध विमानांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. चीन आणि पाकिस्तान या दोन्ही प्रतिस्पर्ध्यांशी एकाच वेळी युद्ध करण्याची वेळ आल्यास भारताला 42 ते 45 स्क्वाड्रन्स अत्याधुनिक युद्ध विमानांची आवश्यकता आहे. सध्या भारताकडे 28 स्क्वाड्रन्स इतकी विमाने असल्याचे बोलले जाते. एका स्क्वाड्रन किंवा तुकडीत 25 विमाने असतात, अशीही माहिती देण्यात आली.
प्रथम विमान 2024 मध्ये
वायुदलाने 89 तेजस विमानांच्या खरेदीचा करार यापूर्वीच केला आहे. यांपैकी प्रथम विमान वायुदलाला फेब्रुवारी 2024 मध्ये मिळणार आहे. त्यानंतर दोन वर्षांनी सर्व विमाने समाविष्ट होणार आहेत. आता त्यात 100 आणखी विमानांची भर पडणार आहे. आगामी 10 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात विमानखरेदी होणार आहे. भारताला किमान 600 विमानांची आवश्यकता आहे.
आत्मनिर्भरतेवर भर
यापुढे भारत आपल्याला आवश्यक असणारी शस्त्रे, अस्त्रे आणि साधने भारतातच निर्माण करणार आहे. अधिकतर प्रमाणात या साधनांचे भाग भारतातच भारतीय तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उत्पादित करण्यात येतील. ही भारतीयीकरणाची प्रक्रिया गेल्या आठ वर्षांमध्ये गतीमान झालेली आहे. तेजस हे भारतीय विमान यापुढे भारताच्या वायुदलाचे प्रमुख विमान म्हणून मान्यता पावेल अशी घोषणा वायुदलप्रमुख चौधरी यांनी केली होती.
आधुनिकतेत अव्वल विमान
तेजस या भारतनिर्मित विमानांमध्ये अलिकडच्या काळात बरीच सुधारणा करण्यात आलेली आहे. त्यामुळे जगातील चौथ्या पिढीतील कोणत्याही अत्याधुनिक विमानाशी याची तुलना केली जाऊ शकते. ते त्यांच्या तोडीस तोड आहे, असे सामरिक तज्ञांचे मत आहे. यातील 65 टक्के भाग हे भारतीय बनावटीचे आहेत. याची उ•ाण क्षमता अत्याधुनिक असून त्यावरचा शस्त्र आणि अस्त्रसंभारही अत्याधुनिक आहे. येत्या 15 वर्षांमध्ये मार्क ए 1 आणि मार्क ए 2 या प्रकारची अनुक्रमे 180 आणि 120 विमाने वायुदलात समाविष्ट होत आहेत.









