वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत पुढील दहा वर्षांत 7 टक्के इतका सरासरी विकास साधण्याच्या मार्गावर असून जागतिक पटलावर विकासाच्या माध्यमातून भारत आपली छाप पाडू शकणार असल्याचे प्रतिपादन टाटा सन्सचे चेअरमन नटराजन चंद्रशेखरन यांनी केले आहे.
बी 20 समिट इंडिया 2023 या परिषदेमध्ये ते बोलत होते. पीएम गतीशक्ती, पीएलआय योजना, कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात, सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर त्याचसोबत स्टार्टअपची वाढणारी संख्या या पार्श्वभूमीवर भारत आगामी काळामध्ये प्रगतीपथावर राहणार आहे. जी-20 देशांमध्ये भारत अधिक मजबूत स्थान प्राप्त करणार आहे. स्थिरता आणि कल्पकतेच्या माध्यमातून नवनवी उद्दिष्टे साकारत भारत विकासाच्या पथावर अग्रस्थानी राहणार असून इतर देशांसाठी आदर्श उदाहरण ठरू शकणार आहे, असेही चंद्रशेखरन यांनी म्हटले आहे.
भारताच्या या विकासात्मक कार्यावरच जगाचे भविष्यसुद्धा ठरणार असल्याचे त्यांनी सांगत पुढील 10 वर्षांच्या काळामध्ये भारत सरासरी 7 टक्के विकास साधणार असल्याचे ते म्हणाले. भारताच्या चांद्र मोहिमेच्या यशाचेही त्यांनी कौतुक केले असून एक मोठी उपलब्धी भारताने प्राप्त केल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. भविष्यात येणाऱ्या मोहिमांना सशर्तपणे सामोरे जाण्याची आणि त्या यशस्वी करण्याची क्षमता भारतात नक्कीच आहे, असेही त्यांनी सांगितले.









