जैस्वाल, गिल यांची शानदार अर्धशतके, अर्शदीप सिंगचे तीन बळी
लॉडेरहिल (अमेरिका)
शनिवारी येथे झालेल्या चौथ्या टी-20 सामन्यात अर्धशतकवीर यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांच्या शानदार दीडशतकी भागीदारीच्या जोरावर भारताने विंडीजचा 18 चेंडू बाकी ठेवून 9 गड्यांनी दणदणीत पराभव केला. या विजयामुळे भारताने पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली आहे.
यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांनी सलामीच्या गड्यासाठी 15.3 षटकात 165 धावांची दणकेबाज भागीदारी करत आपल्या संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला. भारताने पॉवर प्ले दरम्यानच्या 6 षटकात 66 धावा जमवल्या. या जोडीने अर्धशतकी भागीदारी 30 चेंडूत तर शतकी भागीदारी 60 चेंडूत झळकवली. गिलने 30 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारासह तर जैस्वालने 33 चेंडूत 9 चौकारासह अर्धशतक झळकवले. भारताच्या 150 धावा 85 चेंडूत फलकावर लागल्या. या जोडीने 85 चेंडूत दीडशतकी भागीदारी केली. भारताला विजयासाठी 14 धावांची जरुरी असताना गिल शेफर्डच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. गिलने 47 चेंडूत 5 षटकार आणि 3 चौकारासह 77 धावा जमवल्या. जैस्वालने 51 चेंडूत 3 षटकार आणि 11 चौकारासह नाबाद 84 तर तिलक वर्माने 1 चौकारासह नाबाद 7 धावा जमवत विजयाचे सोपस्कार पूर्ण केले.
तत्पुर्वी हेटमेयर आणि शाय हॉप यांच्या दमदार फलंदाजीमुळे विंडीजने भारताला विजयासाठी 179 धावांचे आव्हान दिले. विंडीजने 20 षटकात 8 बाद 178 धावा जमवल्या. हेटमेयर 61 तर हॉपने 45 धावांचे योगदान दिले. अर्शदीप सिंगने 3 तर कुलदीप यादवने 2 तसेच अक्षर पटेल, यजुवेंद्र चहल आणि मुकेशकुमार यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विंडीजच्या फलंदाजांनी सुरुवातीपासूनच धावांची गती राखली होती. त्यांनी पॉवर प्ले दरम्यानच्या 6 षटकात 55 धावा जमवताना दोन गडी गमवले. अर्शदीप सिंगने दुसऱ्या षटकात सलामीच्या मेयर्सला झेलबाद केले. त्याने 7 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह 17 धावा जमवल्या. किंग आणि हॉप या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 35 धावांची भर 24 चेंडूत घातली. अर्शदीप सिंगने किंगला यादव करवी झेलबाद केले. त्याने 16 चेंडूत 2 षटकारांसह 18 धावा जमवल्या. कुलदीप यादवने आपल्या एकाच षटकात विंडीजचे दोन गडी बाद केले. त्याने पुरनला तर त्यानंतर कर्णधार पॉवेलला झेलबाद केले. विंडीजची स्थिती यावेळी 4 बाद 57 अशी होती. हॉप आणि हेटमेयर यांनी पाचव्या गड्यासाठी 49 धावांची भर घातली. चहलने हॉप पटेलकरवी झेलबाद केले. त्याने 29 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारासह 45 धावा जमवल्या. शेफर्डने 6 चेंडूत 1 षटकारासह 9 तर होल्डरने 3 धावा केल्या. हेटमेयर डावातील शेवटच्या षटकात झेलबाद झाला. अर्शदीप सिंगचा हा तिसरी बळी ठरला. हेटमेयरने 39 चेंडूत 4 षटकार आणि 3 चौकारासह 61 धावा जमवल्या. ओडेन स्मिथने 12 चेंडूत 1 षटकारासह नाबाद 15 तर अकिल हुसेनने 1 चौकारासह नाबाद 5 धावा केल्या. विंडीजच्या डावात 11 षटकार आणि 9 चौकार नोंदवले गेले. विंडीजचे पहिले अर्धशतक 33 चेंडूत, शतक 70 चेंडूत, 150 धावा 107 चेंडूत फलकावर लागल्या. हेटमेयरने 35 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारासह अर्धशतक पूर्ण केले. भारतातर्फे अर्शदीप सिंगने 3, कुलदीप यादवने 2 तर अक्षर पटेल, यजुवेंद्र चहल आणि मुकेशकुमार यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : विंडीज 20 षटकात 8 बाद 179 (मेयर्स 1 षटकार आणि 2 चौकारासह 17, किंग 2 षटकारासह 18, हॉप 2 षटकार आणि 3 चौकारासह 45, हेटमेयर 4 षटकार आणि 3 चौकारासह 39 चेंडूत 61, स्मिथ 1 षटकारासह नाबाद 15, अवांतर 3, अर्शदीप सिंग 3-38, कुलदीप 2-26, पटेल 1-39, चहल 1-36, मुकेशकुमार 1-25).
भारत 17 षटकात 1 बाद 179 (यशस्वी जैस्वाल 51 चेंडूत 3 षटकार आणि 11 चौकारासह नाबाद 84, शुभमन गिल 47 चेंडूत 5 षटकार आणि 3 चौकारासह 77, तिलक वर्मा 1 चौकारासह नाबाद 7, अवांतर 11, शेफर्ड 1-35).









