वृत्तसंस्था/ चियांग माई, थायलंड
भारताने एएफसी महिला आशियाई चषक 2026 पात्रता सामन्यांची सुऊवात चियांग माई स्टेडियमवर मंगोलियाविऊद्ध 13-0 असा विजय मिळवून केली. भारतीय संघ मध्यांतराच्या वेळी 4-0 ने आघाडीवर होता. एएफसी महिला आशियाई चषकची मुख्य फेरी आणि आणि पात्रता फेरी यांचा विचार करता भारताचा हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा विजय आहे. यापूर्वी 1997 आणि 2005 मध्ये भारताने गुआमविरुद्ध 10-0 असा विजय मिळवला होता.
प्यारीने (29 वे मिनिट, 45 वे मिनिट, 46 वे मिनिट, 52 वे मिनिट आणि 55 वे मिनिट) सामन्यात पाच गोल केले, तर सौम्या गुगुलोथ (20 वे मिनिट आणि 59 वे मिनिट) आणि प्रियदर्शिनी सेल्लादुराई (73 वे मिनिट व 86 वे मिनिट) यांनी प्रत्येकी दोन गोल केले. संगीता बासफोर (8 वे मिनिट), रिम्पा हलदर (67 वे मिनिट), मालविका (71 वे मिनिट) आणि ग्रेस डांगमेई (75 वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल केला. सामन्याच्या सुऊवातीलाच भारताने सामन्यावर आपली पकड निर्माण केली. यावेळी सौम्याच्या जवळून मिळालेल्या क्रॉसवर बासफोरने गोल करून सुऊवात केली.
त्यानंतर रिम्पाच्या क्रॉसवर सौम्याने शक्तिशाली व्हॉली हाणून भारताची आघाडी दुप्पट केली. मध्यंतरापूर्वी प्यारीने आणखी दोन गोल केले. पहिला सौम्याच्या कट-बॅकवर आणि नंतर जाळीच्या वरच्या कोपऱ्यात शिरलेला एक शक्तिशाली लांब पल्ल्याचा फटका हाणून तिने गोल केला. दुसऱ्या सत्रात भारतीय महिलांनी आणखी वेगाने गोल केले. प्यारीने ग्रेसच्या क्रॉसवर व्हॉली हाणून तिची हॅट्ट्रिक पूर्ण केली. त्यानंतर भारतीय स्ट्रायकरने 55 व्या मिनिटाच्या आत आणखी दोन गोल केले आणि तिच्या गोलची संख्या पाच झाली.
सौम्याने गोलरक्षणातील चुकीचा फायदा घेत भारताचा आठवा गोल केल्यानंतर प्रशिक्षक क्रिस्पिन छेत्री यांनी काही बदल करण्याचा निर्णय घेतला आणि सेंटर-बॅक पूर्णिमा कुमारी, प्रियदर्शिनी आणि मालविका यांना मैदानात उतरवले. नंतर, रंजना चानू आणि गोलकीपर मोनालिसा देवी यांनाही काही वेळ खेळण्याची संधी देण्यात आली. रिंपा, मालविका आणि प्रियदर्शिनी यांनी जवळजवळ एकामागून एक गोल केले. त्यामुळे भारताने दुहेरी आकडा ओलांडला. त्यानंतर ग्रेस डांगमेईने पेनल्टीवर भारताची गोल संख्या 12 वर नेली. वेळ संपत आलेली असताना प्रियदर्शिनीने तिचा दुसरा आणि भारताचा 13 वा गोल केला.









