वृत्तसंस्था/ बेंगळूर
भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघातील पहिला वनडे सामना येथे रविवारी खेळविला जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा महिला क्रिकेट संघ तीन आठवड्यांच्या कालावधीसाठी भारताच्या दौऱ्यावर आला असून या दौऱ्यात क्रिकेटमधील तिन्ही प्रकारातील मालिका खेळविल्या जाणार आहेत. मात्र जेमिमा रॉड्रिग्ज आणि पूजा वस्त्रकर यांच्या तंदुरूस्ती समस्येबाबत भारतीय गोटात साशंकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
येत्या ऑक्टोबर महिन्यात आयसीसीची महिलांची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा बांगलादेशमध्ये भरवली जाणार आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेपूर्वी भारतीय महिला क्रिकेट संघाला सरावाची संधी मिळावी या हेतूने दक्षिण आफ्रिकेचा तीन आठवड्यांचा दौरा आयोजित केला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाला गेल्या जानेवारी महिन्यात मायदेशात ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे आणि टी-20 मालिका गमवाव्या लागल्या होत्या. त्यानंतर भारतीय महिला संघाने बांगलादेशचा टी-20 मालिकेत 5-0 असा एकतर्फी पराभव केला होता. भारतीय महिला संघाला अमोल मुजूमदार हे प्रमुख प्रशिक्षक म्हणून लाभत आहेत.
रविवारी येथे होणाऱ्या या सामन्यापूर्वी रॉड्रिग्ज आणि वस्त्रकर यांना आपल्या तंदुरूस्तीबाबत चाचणी द्यावी लागेल. बांगलादेश बरोबर झालेल्या सर्व सामन्यांमध्ये वस्त्रकरचा समावेश संघात करण्यात आला होता. दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघामध्ये नवोदीत उमा छेत्रीचा समावेश आहे. यास्तिका भाटिया जखमी असल्याने ती रविवारच्या सामन्यात खेळू शकणार नाही. आयासीसीची महिलांची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2025 साली भारतात होणार आहे. दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व लॉरा उलव्हर्टकडे सोपविण्यात आले आहे. रविवारच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा असून स्मृती मानधना, शेफाली वर्मा, दिप्ती शर्मा, रिचा घोष यांच्या कामगिरीवर अधिक लक्ष राहिल.









