वृत्तसंस्था /रांची
आशियाई चॅम्पियन्स करंडक महिलांच्या हॉकी स्पर्धेला शुक्रवारपासून येथे प्रारंभ होत आहे. सविता पुनियाच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला हॉकी संघाच्या मोहिमेला येथे थायलंड विरुद्धच्या सामन्याने प्रारंभ होत आहे. चीनमध्ये नुकत्याच झालेल्या आशियाई स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाला उपांत्य फेरीच्या सामन्यात चीनकडून 0-4 असा एकतर्फी पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर भारताने जपानचा 2-1 असा पराभव करत कास्यपदक मिळवले होते. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाला सुवर्णपदकासाठी फेवरीट म्हणून ओळखले गेले होते पण त्यांच्याकडून साफ निराशा झाली. आशियाई स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने सुवर्णपदक मिळवले असते तर त्यांना पुढील वर्षी होणाऱ्या पॅरीस ऑलिम्पिकसाठी थेट प्रवेश मिळाला असता. आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघाला विद्यमान आशियाई स्पर्धेतील विजेत्या चीनकडून झालेल्या पराभवाची परतफेड करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी लागेल. आशियाई चॅम्पियन्स करंडक महिलांच्या हॉकी स्पर्धेत एकूण सहा संघांचा समावेश आहे. यजमान भारत, चीन, जपान, कोरिया, मलेशिया आणि थायलंड यांच्यामध्ये जेतेपदासाठी चुरस राहिल. सदर स्पर्धा राऊंड रॉबिन साखळी पद्धतीने खेळवली जाणार असून या टप्प्यात अखेरीस पहिले चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. भारताचा पहिला सामना शुक्रवारी थायलंड बरोबर होणार आहे.









