चीनला बसणार मोठा झटका
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारत ते चीनपर्यंत तयार करण्यात आलेल्या स्टिलवेल रोडच्या धर्तीवर एशियन हायवेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मणिपूरनंर म्यानमार आणि मग हा महामार्ग थायलंडपर्यंत जाणार आहे. मोदी सरकारच्या अॅक्ट ईस्ट धोरणाच्या अंतर्गत असलेल्या या सर्वात मोठ्या प्रकल्पाचे आता 70 टक्क्यांपर्यंत काम पूर्ण झाले आहे.
या प्रकल्पावर वेगाने काम सुरू होते, परंतु मणिपूरमधील स्थिती बिघडल्याने काही अडचणी उभ्या राहत आहेत. या अडचणी लवकरच दूर केल्या जाणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी दिली आहे.

या महामार्गाचे काम 2027 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, यानंतर भारतातून थायलंडपर्यंत रस्तेमार्गाने जाता येणार आहे. भारत-म्यानमार आणि थायलंड या तिन्ही देशांनी एकत्र येत या महामार्गाचे काम हाती घेतले आहे. या महामार्गाची एकूण लांबी सुमारे 1400 किलोमीटर इतकी आहे. या प्रकल्पाचा प्रस्ताव अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने मांडला होता. परंतु त्यानंतर या प्रकल्पाकरता कुठलीच पावले उचलली गेली नव्हती. 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर या प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली.
तीन देशांना जोडणारा हा महामार्ग कोलकात्यापासून सुरूत होत सिलीगुडीपर्यंत जाणार आहे आणि मग कूचबिहारमार्गे आसाममध्ये प्रवेश करणार आहे. आसाममधून दीमापूर आणि नागालँडनंर मणिपूरच्या इंफाळनजीक मोरेह येथे हा मार्ग विदेशात म्हणजेच म्यानमारमध्ये प्रवेश करणार आहे. म्यारमारमध्ये बागो आणि यंगूनमार्गे लोकांना थायलंडमध्ये प्रवेश करता येणार आहे.
या महामार्गाच्या निर्मितीनंतर ईशान्य भारताच्या अर्थव्यवस्थेत मोठी सुधारणा होईल असे मानले जात आहे. तसेच चीनला या प्रकल्पामुळे झटका बसणार आहे. पूर्व आशियाई देशांच्या बाजारपेठेत स्थान मिळविण्यास भारताला या महामार्गामुळे मदत होणार आहे. तेथील चीनची मक्तेदारी मोडून काढता येणार आहे. तसेच भारताकडून रस्तेमार्गाने मालवाहतूक झाल्यानंतर या देशांची चीनवरील निर्भरता कमी होणार आहे. यामुळे अनेक देश पुरवठासाखळी म्हणून भारताला प्राधान्य देतील असे मानले जात आहे.









