वृत्तसंस्था /नवी दिल्ली
पेहलगाम हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला असतानाच, भारताने अरबी समुद्रात सागरी क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण करुन पाकिस्तानला दणका दिला आहे. भारताच्या नौदलातील विनाशिका आयएनएस सुरत या नौकेवरुन या क्षेपणास्त्राचे परीक्षण गुरुवारी करण्यात आले. क्षेपणास्त्राने पूर्वनिर्धारित लक्ष्यावर अचूक हल्ला करुन ते उडविले आणि आपल्या क्षमतेचा परिचय करुन दिला. हे सागरपृष्ठावरुन आकाशात मारा करणारे मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे. या यशस्वी परीक्षणामुळे नौदलाच्या सामर्थ्यात भर पडली आहे.
या परीक्षणाची माहिती भारतीय नौदलाने दिली. या परीक्षणामुळे आमचा आत्मविश्वास अधिकच वाढला आहे. आमची मारक क्षमता या क्षेपणास्त्रामुळे अधिकच वाढली आहे. पेहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एका क्षेपणास्त्राची चाचणी करणार आहे, असे वृत्त होते. पण पाकिस्तानने ते पाऊल उचलण्याआधीच भारताने आपल्या स्वदेशनिर्मित क्षेपणास्त्राचे परीक्षण यशस्वी केल्याने पाकिस्तानला योग्य तो संदेश मिळाला असून भारतासमोर दु:साहस केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, हे पाकिस्तानला या परीक्षणामुळे कळेल, असे तज्ञांचे मत आहे.
हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शक्तीप्रदर्शन
पेहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने केलेले हे एक शक्तीप्रदर्शनच आहे, असे मानले जात आहे. भारताने पाकिस्तानला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरही आपल्या सैन्याला सज्जतेचा इशारा दिला आहे. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज रहा, असा आदेश सीमांवरील सैनिक तुकड्यांना दिला गेला आहे. पेहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांना वेचून ठार केल्याने देशभर संतापाची लाट उसळली असून पाकिस्तानला धडा शिकविण्याची मागणी होत आहे. भारत सरकारनेही कृती करण्याचे संकेत दिले आहेत.









