वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पुढील वर्षी आयीसीसीची 19 वर्षाखालील वयोगटाची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेच्या दृष्टीकोनातून भारतीय युवा संघाला सरावाची संधी अधिक मिळावी याकरिता तिरंगी मालिका आयोजित केली आहे. सदर मालिकेचे यजमानपद दक्षिण आफ्रिका भूषवित आहे.
या तिरंगी मलिकेला 29 डिसेंबरपासून प्रारंभ होत आहे. जोहान्सबर्गच्या ओल्ड एडवर्डनियास क्रिकेट क्लबच्या मैदानावर सामने खेळवले जातील. भारत, यजमान दक्षिण आफ्रिका आणि अफगाणचे युवा संघ यामध्ये सहभागी होत आहेत. प्रत्येक संघ दुसऱ्या संघाबरोबर दोनदा सामने खेळणार आहे. भारताचा पहिला सामना 29 डिसेंबरला अफगाणबरोबर, तर दुसरा सामना 2 जानेवारीला द. आफ्रिका बरोबर होणार आहे. अंतिम सामना 10 जानेवारीला खेळवला जाईल. आयसीसीची 19 वर्षाखालील वयोगटाची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 19 जानेवारीपासून द. आफ्रिकेतील ब्लोमफौंटन येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी भारताचा अ गटात समावेश आहे. अ गटात भारत, बांगलादेश, आयर्लंड आणि अमेरिका यांचा समावेश राहिल. भारताचा या स्पर्धेतील सलामीचा सामना 20 जानेवारीला बांगलादेशबरोबर खेळवला जाईल.









