वृत्तसंस्था/ कोलकाता
विश्वचषकात आज रविवारी येथे होणार असलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सामना आतापर्यंत अपराजित राहिलेल्या भारतीय संघाशी होणार असून यावेळी दोन्ही संघांमध्ये आघाडीच्या स्थानासाठी चुरस राहणार आहे. 2011 च्या स्पर्धेत भारत एकमेव सामना दक्षिण आफ्रिकेविरूद्ध हरला होता.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील खेळाडूंनी आत्मसंतुष्टतेपासून आज दूर राहणे आवश्यक आहे. आजचा सामना जिंकल्यास 16 गुणांनिशी भारताचे अव्वल स्थान निश्चित होईल. त्यानंतर त्यांचा फक्त नेदरलँड्सविरू
द्धचा सामना बाकी राहील. ‘पॉवर हिटर’ आणि ‘गेम चेंजर्स’नी भरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीसमोर उपांत्य फेरीपूर्वी भारताच्या वेगवान माऱ्याचा निश्चित कस लागेल. या विश्वचषकात सातत्याने मोठी धावसंख्या उभारलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला गोलंदाजी करणे हे आव्हानात्मक राहिलेले आहे. प्रथम फलंदाजी केलेल्या सर्व पाच सामन्यांमध्ये त्यांनी 300 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत आणि त्याचा मुख्य शिल्पकार डी कॉक राहिला आहे.
मात्र लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांचा कमकुवतपणा दिसून आलेला आहे. नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेला 207 धावांत गुंडाळले होते. पाकिस्तानविऊद्धही 271 धावांचे आव्हान त्यांनी शेवटच्या षटकात पार केले. दुसरीकडे भारताने दाखवून दिले आहे की, ते लक्ष्याचा पाठलाग करू शकतात आणि उभारलेल्या धावसंख्येचा चांगला बचावही करू शकतात. ईडन गार्डन्सवर दव पडत असल्याने लक्ष्याचा पाठलाग करणे सोपे जाईल. असे असले, तरी दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्यांदा फलंदाजी करण्यापेक्षा आधी फलंदाजी करून आक्रमण करणे पसंत असेल.

अष्टपैलू हार्दिक पंड्या दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर पडलेला असला, तरी भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी फॉर्मात असून त्याने तीन सामन्यांत 14 बळी घेतले आहेत. दुसरीकडे, जसप्रीत बुमराहने त्याच्या गोलंदाजीत एक घातक स्लोअर यॉर्कर जोडला आहे आणि मोहम्मद सिराजनेही त्याला नवीन चेंडूवर उत्तम साथ दिली आहे. या विश्वचषकात मिळून सहा शतके झळकावलेल्या डी कॉक आणि रॅसी व्हॅन डर डुसेन यांना लवकर परत पाठवण्यात भारतीय गोलंदाजांनी यश मिळविले, तर अर्धी लढाई जिंकल्यासारखे होईल. फिरकी चांगल्या प्रकारे खेळणारा हेन्रिक क्लासेन विरुद्ध कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा अशीही एक लढत या सामन्यात पाहायला मिळेल.
संघ : भारत-रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव आणि प्रसिद्ध कृष्णा.
दक्षिण आफ्रिका-टेम्बा बावुमा (कर्णधार), जेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅनसेन, हेन्रिक क्लासेन, अँडीले फेहलुकवायो, केशव महाराज, एडेन मार्करम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी, रॅसी व्हॅन डर डुसेन आणि लिझाद विल्यम्स.
सामन्याची वेळ : दुपारी 2 वा.

हार्दिक पंड्या स्पर्धेबाहेर, प्रसिद्ध कृष्णा संघात
भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या घोट्याच्या दुखापतीतून सावरू शकलेला नसून तो विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी 17 एकदिवसीय सामने खेळलेला वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे, असे ‘आयसीसी’ने कळविले आहे. 19 ऑक्टोबर रोजी बांगलादेशविऊद्धच्या सामन्यात स्वत:च्या गोलंदाजीवर चेंडू अडविताना पंड्याच्या डाव्या घोट्याला दुखापत झाली होती.









