वृत्तसंस्था/ दुबई
हैदराबादमधील कसोटीत इंग्लंडकडून पराभव झाल्यानंतर भारताची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मानांकनात घसरण झाली असून ते आता बांगलादेशपेक्षा खाली पाचव्या स्थानावर फेकले गेले आहेत.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची दोन कसोटींची मालिका बरोबरीत सोडविल्यानंतर भारतीय संघ काही काळ अग्रस्थानावर होता. पण ऑस्ट्रेलियाने पाकवर विजय मिळवित ते अग्रस्थान पुन्हा एकदा पटकावले. रोहित शर्माचा भारतीय संघ परसेंटेज गुणांमध्ये मागे पडला असून दक्षिण आफ्रिका मालिकेनंतर ते 54.16 वरून 43.33 टक्क्यांवर घसरले आहेत. पहिल्या कसोटीत 231 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव 202 धावांत आटोपल्याने त्यांना 28 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.
ऑस्ट्रेलिया 55 टक्क्यांसह पहिल्या स्थानावर असून त्यांना ब्रिस्बेन कसोटीत विंडीजकडून 8 धावांनी धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला असला तरी त्यांच्या क्रमवारीवर फारसा परिणाम झालेला नाही. द.आफ्रिका, न्यूझीलंड व बांगलादेश या तिन्ही संघांचे टक्केवारी 50 असून ते दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या स्थानावर आहेत. पाक, विंडीज, इंग्लंड व लंका हे भारताच्याही खालच्या क्रमांकावर आहेत. 2023-2025 या कालावधीत होणाऱ्या कसोटीत विजयासाठी 12, अनिर्णीत सामन्यासाठी 4 व टायसाठी 6 गुण संघांना दिले जातात.









