अमेरिकेचीची होती काही वर्षांपासूनची इच्छा
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
भारताने रशियाकडून इंधन तेल खरेदी केल्यास भारताच्या वस्तूंवर मोठ्या प्रमाणात अतिरिक्त कर लावला जाईल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दिला आहे. तथापि, भारताने रशियाकडून स्वस्तात तेल घ्यावे, अशी अमेरिकेचीच इच्छा होती, असा गौप्यस्फोट अमेरिकेचे भारतातील माजी राजदूत एरिक गार्सेटी यांनी केला आहे. सध्या या संबंधातील एक माहिती प्रसारित होत आहे. त्यातून भारत-अमेरिका संबंधांमधील अनेक बाबी स्पष्ट होत आहेत.
यातून अमेरिकेची परस्परविरोधी भूमिका स्पष्ट होत आहे. काही वर्षांपूर्वी अमेरिकेनेच भारताला रशियाकडून इंधन तेल विकत घेण्यास प्रवृत्त केले होते. भारताने रशियाकडून स्वस्त तेल विकत घेतल्यास आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे दर उतरतील आणि अमेरिकेलाही त्याला लाभ होईल असे अमेरिकेचे धोरण होते. त्यावेळी भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्याचे आवाहन करुन तेलाच्या जागतिक बाजारात स्थैर्य आणण्याचा अमेरिकेचा प्रयत्न होता. ही बाब गार्सेटी यांनी मागच्या वर्षीच एका कार्यक्रमात स्पष्ट केली होती. त्यांच्या त्या भाषणाचे व्हिडीओ चित्रण सध्या मोठ्या प्रमाणात प्रसारित केले जात आहे.
बॉब मॅकनेली यांचेही प्रतिपादन
अमेरिकेच्या रॅपिडान एनर्जी समूहाचे मुख्य अधिकारी बॉब मॅकनेली यांनीही या संदर्भात एक महत्वाची माहिती दिली होती. त्यांचा व्हिडीओही सध्या प्रसारित होत आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष जो बायडेन यांनी भारताकडे असा आग्रह धरला होता, की भारताने रशियाकडून तेल घ्यावे. त्यानुसार भारताने रशियाकडून तेल विकत घेण्याचे प्रमाण वाढविले होते. 11 वर्षांपूर्वी भारत रशियाकडून खरेदी करत असलेल्या तेलाचे प्रमाण भारताच्या एकंदर तेल आवश्यकतेच्या 2 टक्के होते. तथापि, आता भारत रशियाकडून आपल्या आवश्यकतेच्या 26 टक्के तेल खरेदी करत आहे. याला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा आक्षेप आहे.
किती अतिरिक्त कर ?
रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे अमेरिका भारतावर किती अतिरिक्त कर लावू शकेल, यासंबंधीचे अनुमानही मॅकनेली यांनी व्यक्त केले आहे. केवळ भारतच नव्हे, तर रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या इतर देशांवरही अमेरिका मोठा कर लावू शकतो. हा कर 25 टक्के, 50 टक्के, 75 टक्के किंवा 100 टक्केही असू शकतो. याचा फटका चीनलाही बसणार आहे. तथापि, तो भारताला अधिक प्रमाणात बसेल. भारताने यासाठी सज्ज असावयास हवे, असे त्यांचे म्हणणे आहे.
भारताने काय केले पाहिजे…
गेल्या 10 वर्षांमध्ये भारताचा अमेरिकेशी व्यापार मोठ्या प्रमाणात वाढला असून तो 2014 च्या तुलनेत दुप्पट झाला आहे. आता अमेरिकेच्या कर धोरणामुळे त्यात घट होण्याची दाट शक्यता आहे. अशावेळी भारताने नेमके कोणते धोरण स्वीकारले पाहिजे, यावर तज्ञांमध्ये बरीच मतमतांतरे आहेत. ही कोंडी फुटावी अशी अनेकांची इच्छा आहे. तथापि, ती फोडण्यासाठी दोन्ही देशांनी सकारात्मक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे मत आर्थिक वर्तुळात व्यक्त केले जात आहे.









