टी-20 वर्ल्डकपमधील अपयशाच्या पार्श्वभूमीवर माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारात फलंदाजीच्या बळावर यश खेचून आणण्याची मलिका कायम राखण्यासाठी भारताने विशेषतः फलंदाजीत ‘अल्ट्रा अग्रेसिव्ह’ राहणे अटळ आहे, असे स्पष्ट प्रतिपादन माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केले. भारतीय संघ या आठवडाअखेरीस आशिया चषक स्पर्धेत सहभागी होत असून त्या पार्श्वभूमीवर शास्त्री बोलत होते.
यापूर्वी डावाच्या प्रारंभी बचावात्मक पवित्र्यावर भर दिल्याने गतवर्षी टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताचे आव्हान लवकरच संपुष्टात आले होते. शास्त्री यांच्यासाठी मुख्य प्रशिक्षक या नात्याने ती शेवटची स्पर्धा होती.

‘भारताने नंतर जी आक्रमकता अंगीकारली, ती कायम राखणे आवश्यक आहे. मी प्रशिक्षक असताना आघाडीवीरांनी बचावात्मक फलंदाजी करण्याची चूक करु नये, याबद्दल सातत्याने आग्रही असायचो. आक्रमक फलंदाजी केली तरी काही सामने गमवावे देखील लागतात. पण, प्रारंभीच सामने जिंकता आले तर निश्चितपणाने मनोबल उंचावते’, असे शास्त्री पुढे म्हणाले.
आशिया चषक स्पर्धेत विराट कोहली अंतिम एकादशमध्ये दाखल होत आहे. यापूर्वी विंडीजविरुद्ध मालिकेतून त्याला विश्रांती देण्यात आली होती. त्याशिवाय, केएल राहुल देखील दुखापतीतून सावरत संघात परतला आहे. या उभयतांकडूनही त्याच आक्रमकतेची अपेक्षा ठेवावी का, या प्रश्नावर देखील शास्त्री यांनी होकारार्थी उत्तर दिले.
‘विराट व केएल राहुल उत्तम, अनुभवी खेळाडू आहेत आणि त्यांनी आयपीएल व टी-20 बरेच खेळले आहे. साहजिकच, या क्रिकेट प्रकाराशी जुळवून घेणे त्यांच्यासाठी अजिबात कठीण नाही. रिषभ पंत, हार्दिक पंडय़ा व जडेजासारखे खेळाडू हाताशी असल्याने मध्यफळीत व तळाच्या फळीतही फलंदाजीत बरीच खोली आहे. एखाद्या प्रसंगी आघाडी फळीतील फलंदाज अपयशी ठरले तर हे फलंदाज कसर भरुन काढू शकतात’, याचा शास्त्री यांनी पुढे उल्लेख केला.
पंडय़ा, बुमराहचा वर्कलोड महत्त्वाचा
ते म्हणाले, ‘हार्दिक पंडय़ा परतत असल्याने संघ सम् होईल. गतवर्षी विश्वचषक स्पर्धेत तो गोलंदाजी करु न शकल्याने याची संघाला मोठी किंमत मोजावी लागली. जर तो संघात नसेल तर संघाचा बॅलन्स बिघडतो. यावरुन त्याचे महत्त्व लक्षात येईल. याचप्रमाणे बुमराह आणखी महत्त्वाचा खेळाडू आहे. बुमराह व पंडय़ा या दिग्गजांवरील वर्कलोडबाबत गांभीर्याने विचार होण्याची गरज आहे’.
विराटकडून जोरदार कामगिरीची अपेक्षा
‘माझा अलीकडे विराटशी संवाद झालेला नाही. मात्र, हे काही रॉकेट सायन्स नाही. जागतिक स्तरावर खेळत असताना मन थकलेले असेल तर अगदी सर्वोत्तम खेळाडूही झाकोळून जाऊ शकतात. विराटला मानसिक, शारीरिक विश्रांतीची खूप आवश्यकता होती. आता तो शांत चित्ताने मैदानात उतरेल. पहिल्याच सामन्यात त्याने एखादे अर्धशतक साजरे केले तरी टीकाकारांना चोख प्रत्युत्तर मिळेल. वास्तविक, विराटसारखा दुसरा कोणताही तंदुरुस्त खेळाडू माझ्या दृष्टिक्षेपात नाही. विराटची धावांची भूक, जिंकण्याची तळमळ जैसे थे असेल आणि आता जो खराब फॉर्म आहे, तो त्याला बरेच काही शिकवून जाणारा असेल’, असे निरीक्षण 60 वर्षीय शास्त्री यांनी पुढे नोंदवले.
नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा
सायंकाळी 6 नंतर सुरु होणाऱया सामन्यात 90 टक्के वेळा नाणेफेक जिंकणारे संघ बाजी मारुन जातात, हा पूर्वानुभव आहे. क्षेत्ररक्षण करत असलेल्या संघाला डय़ू फॅक्टरचा सामना करावा लागत नाही, यामुळे हा फरक पडतो. दोन्ही संघांना समसमान डय़ू फॅक्टरला सामोरे जावे लागेल, अशी व्यवस्था असायला हवी, याचा शास्त्री यांनी पुढे उल्लेख केला.
वासिम अक्रम म्हणतो, खराब फॉर्ममध्ये असला तरी विराटच ‘ग्रेट’!

आधुनिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये प्राधान्याने गणल्या जाणाऱया विराट कोहलीला मागील दोन वर्षात धावा जमवण्यासाठी प्रचंड झगडावे लागत असले तरी पाकिस्तानचा माजी अष्टपैलू वासिम अक्रमने विराटच ग्रेट असल्याचे स्पष्टपणे नमूद केले. इतक्या लवकर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमची तुलना विराटशी करणे चुकीचे असल्याचे त्याने येथे सांगितले.
रविवार दि. 28 रोजी भारत-पाकिस्तान यांच्यात आशिया चषक स्पर्धेतील लढत होत असून त्यात विराट कोहली विश्रांतीनंतर ताजेतवाने होऊन संघात परतत आहे. त्या पार्श्वभूमीवर अक्रम बोलत होता.

विराट कोहली नोव्हेंबर 2019 नंतर एकही शतक झळकावू शकलेला नसताना दुसरीकडे, बाबर आझम आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम बहरात आहे. अगदी तिन्ही क्रिकेट प्रकारात बाबर लक्षवेधी योगदान देण्यात यशस्वी ठरला. पण, यानंतरही अक्रमने बाबरची तुलना विराटशी होऊ शकत नसल्याचे स्पष्टपणे सांगितले.
‘सर्वप्रथम भारतीय चाहत्यांची विराटवर होत असलेली टीका निव्वळ अनाठायी व अनावश्यक आहे, हे मी निक्षून सांगू इच्छितो. विराट समकालीन नव्हे तर सर्वकालीन महान खेळाडूंपैकी एक आहे आणि आताही त्याच्यात बरीच जिगर आहे. भारतीय संघातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांमध्ये त्याचा आवर्जून समावेश होतो. विराटचा क्लास कायम स्वरुपाचा आहे. तो पाकिस्तानविरुद्ध फारसा खेळू नये, असे मला व्यक्तिशः वाटते. पण, एकदा बहरात परतल्यानंतर त्याला रोखणे निश्चितच आव्हानात्मक असेल’, असा इशारा अक्रमने दिला.
‘समकालीन खेळाडूंत नेहमीच तुलना होत असते. आम्ही खेळत असताना इंझमाम, द्रविड, सचिन तेंडुलकर यांच्यात चाहते तुलना करत असत. त्यापूर्वी, सुनील गावसकर, जावेद मियांदाद, गुंडाप्पा विश्वनाथ व झहीर अब्बास यांच्यात तुलना होत असे. वर्तमानाचा विचार करता बाबर आझम तंत्रशुद्धतेमुळे सातत्यपूर्ण योगदान देत आला आहे. त्याची तंदुरुस्ती लक्षवेधी आहे. नेतृत्वात तो बऱयाच बाबी आत्मसात करत आला आहे. मात्र, तरीही त्याची विराटशी बरोबरी होत नाही’, असे अक्रमने शेवटी नमूद केले.
शाहीनच्या गैरहजेरीमुळे धक्का

गतवर्षी टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताच्या आघाडी फळीला मोठा सुरुंग लावण्यात यशस्वी ठरलेल्या डावखुऱया शाहीन आफ्रिदीला यंदा गुडघ्याच्या दुखापतीमुळे आशिया चषक स्पर्धेतून बाहेर जावे लागले असून पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का असल्याचे अक्रमने यावेळी स्पष्ट केले.
शाहिन जागतिक स्तरावरील 3 सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक असून यामुळे पाकिस्तान संघाला त्याची गैरहजेरी प्रकर्षाने जाणवेल. शाहीनची जागा भरुन काढणे कठीण असेल, असे तो पुढे म्हणाला.









