ऑस्ट्रेलियाचा 8 बाद 270 धावांवर दुसरा डाव घोषित, भारताला विजयासाठी अद्याप 280 धावांची गरज, कोहली नाबाद 44
वृत्तसंस्था/ लंडन
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतीच्या चौथ्या दिवशी उपाहारानंतर ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव 8 बाद 270 धावांवर घोषित करून भारताला 444 धावांचे विजयाचे आव्हान दिले. अॅलेक्स कॅरेने जलद नाबाद 66 धावा फटकावल्या. त्यानंतर भारताने दुसऱ्या डावात दिवसअखेर 40 षटकांत 3 बाद 164 धावा जमविल्या असून त्यांना अद्याप 280 धावांची गरज आहे. दिवसअखेर कोहली 44 व अजिंक्य रहाणे 20 धावांवर खेळत होते.
भारताने चांगली सुरुवात करताना रोहित व गिल यांनी 41 धावांची भागीदारी केली. पण गिल ग्रीनने घेतलेल्या वादग्रस्त झेलामुळे बाद झाला. त्यानंतर स्थिरावलेला रोहित लियॉनच्या फिरकीवर स्वीपचा फटका मारताना पायचीत झाला. त्याने 60 चेंडूत 7 चौकार, 1 षटकारासह 43 धावा काढल्या. सेट झालेला पुजाराही फारवेळ टिकला नाही. कमिन्सच्या उसळत्या चेंडूला यष्टीमागे टोलवण्याच्या प्रयत्नात तो यष्टिरक्षकाकरवी झेलबाद झाला. त्याने 47 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 27 धावा जमविल्या. कोहली व रहाणे यांनी अखेरपर्यंत आणखी पडझड होऊ न देता चौथ्या गड्यासाठी अभेद्य 71 धावांची भागीदारी केली आहे. कोहली 60 चेंडूत 7 चौकारांसह 44 व रहाणे 59 चेंडूत 3 चौकारांसह 20 धावांवर खेळत आहेत. कमिन्स, बोलँड, लियॉन यांनी एकेक बळी मिळविला.
कॅरेचे अर्धशतक
ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवशीअखेर 4 बाद 123 धावा जमविल्या होत्या. या धावसंख्येवरून चौथ्या दिवसाच्या खेळाला त्यांनी पुढे सुरुवात केली आणि उपाहारापर्यंत दोन बळी गमवित 6 बाद 201 धावांची मजल मारत भारतावर एकूण 374 धावांची आघाडी मिळविली. या सत्रात त्यांनी 26 षटकांत 78 धावांची भर घातली, पण धावांसाठी त्यांना संघर्ष करावा लागला. अॅलेक्स कॅरेने मात्र फटकेबाजी करीत या सत्रात 61 चेंडूत 41 धावा काढल्या. उपाहारास खेळ थांबला तेव्हा स्टार्क नाबाद 11 धावा करीत त्याला साथ देत होता.
स्वच्छ वातावरणात खेळाला सुरुवात झाल्यानंतर खेळपट्टीकडून सीमर्स व स्पिनर्स दोघांनाही साथ मिळत होती. दिवसातील तिसऱ्याच षटकात लाबुशेन 41 धावांवर बाद झाला. त्याला आदल्या दिवशीच्या धावसंख्येत एकाही धावेची भर घालता आली नाही. उमेश यादवच्या एका अप्रतिम चेंडूवर स्लिपमध्ये तो झेलबाद झाला. 44 षटके जुन्या चेंडूवर उमेश व शमी उष्ण व कोरड्या वातावरणात रिव्हर्स स्विंग मिळविण्याचा प्रयत्न करीत होते.
पॅव्हेलियन एन्डच्या बाजूने ठरावीक ठिकाणी चेंडूचा टप्पा पडल्यानंतर वर उसळत होता किंवा सरळ स्किड होत होता. त्यामुळे फलंदाजांना चेंडूचा अंदाज घेण्यात अडचण येत होती. सिराजचा एक चेंडू स्पॉटवर पडल्यानंतर उसळी घेतला आणि ग्रीनच्या उजव्या खांद्यावर आदळला. सुरुवातीची आठ षटके झाल्यानंतर जडेजाची फिरकी सुरू करण्यात आली.
त्याने लेगस्टंपच्या बाहेर टप्पा टाकून चेंडू आत वळण्याची चाल केली. त्याची ही चाल यशस्वी ठरली आणि ग्रीननेफॉरवर्ड डिफेन्सिव्ह फटका खेळण्यासाठी पुढे पाऊल टाकले. पण चेंडू किंचीत उसळला आणि त्याच्या ग्लव्ह्जला लागून यष्टीवर जाऊन पडला. ग्रीनने 95 चेंडूत 25 धावा केल्या. यावेळी ऑस्ट्रेलियाने 6 बाद 167 धावा जमविल्या होत्या. नंतर स्टार्क व कॅरे यांनी फटकेबाजी करीत जलद 93 धावांची भर घातली.
उपाहारानंतर जलद धावा करण्याचे धोरण ऑस्ट्रेलियाने ठेवले. स्टार्कने जोरदार फटकेबाजी करीत 57 चेंडूतच 41 धावा फटकावल्या. त्यात 7 चौकारांचा समोवश होता. शमीने कोहलीकरवी स्टार्कला झेलबाद केले. आणखी 10 धावांची भर पडल्यानंतर कर्णधार कमिन्सचा झेल बदली खेळाडू अक्षर पटेलने टिपल्यानंतर ऑस्ट्रेलियाने 8 बाद 270 धावांवर दुसरा डाव घोषित केला. कॅरे 105 चेंडूत 8 चौकारांसह 66 धावांवर नाबाद राहिला. पहिल्या डावात फलंदाजी करताना बोटास दुखापत झाल्याने अजिंक्य रहाणे शनिवारी क्षेत्ररक्षणास उतरला नव्हता. भारतातर्फे जडेजाने 3, उमेश यादव व शमीने प्रत्येकी 2, सिराजने एक बळी टिपला.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया प.डाव : 121.3 षटकांत सर्व बाद 469.
भारत प.डाव 69.4 षटकांत सर्व बाद 296 : रोहित शर्मा 15, गिल 13, पुजारा 14, कोहली 14, अजिंक्य रहाणे 89 (129 चेंडूत 11 चौकार, 1 षटकार), जडेजा 48 (51 चेंडूत 7 चौकार, 1 षटकार), केएस भरत 5, शार्दुल ठाकुर 51 (109 चेंडूत 6 चौकार), उमेश यादव 5, शमी 13 (11 चेंडूत 2 चौकार), सिराज नाबाद 0, अवांतर 29. गोलंदाजी : कमिन्स 3-83, स्टार्क 2-71, बोलँड 2-59, ग्रीन 2-44, लियॉन 1-19.
ऑस्ट्रेलिया दु.डाव 84.3 षटकांत 8 बाद 270 डाव घोषित : ख्वाजा 13, वॉर्नर 1, लाबुशेन 41 (126 चेंडूत 4 चौकार), स्मिथ 34 (47 चेंडूत 3 चौकार,), हेड 18 (27 चेंडूत 2 षटकार), ग्रीन 25 (95 चेंडूत 4 चौकार), कॅरे नाबाद 66 (105 चेंडूत 8 चौकार), स्टार्क 41 (57 चेंडूत 7 चौकार), कमिन्स 5, अवांतर 26. गोलंदाजी : जडेजा 3-58, शमी 2-39, उमेश यादव 2-54, सिराज 1-80.
भारत दु.डाव 40 षटकांत 3 बाद 164 : रोहित 43 (60 चेंडूत 7 चौकार, 1 षटकार), गिल 19 चेंडूत 18, पुजारा 27 (47 चेंडूत 5 चौकार), कोहली खेळत आहे 44 (60 चेंडूत 7 चौकार), रहाणे खेळत आहे 20 (59 चेंडूत 3 चौकार), अवांतर 12. गोलंदाजी : बोलँड 1-38, कमिन्स 1-42, लियॉन 1-32.