औषधांसह 38 टन साहित्य पाठवले
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताने रविवारी पॅलेस्टाईनमधील लोकांसाठी साडेसहा टन वैद्यकीय मदत आणि 32 टन आपत्ती निवारण साहित्य पाठवले. भारतीय हवाई दलाचे सी-17 वाहतूक विमान इजिप्तच्या अल-अरिश विमानतळावर मदत सामग्री घेऊन रवाना झाले आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सतत युद्ध सुरू असतानाच भारताने रविवारी युद्धप्रभावित पॅलेस्टाईनमधील लोकांसाठी 38 टन आपत्ती निवारण साहित्य पाठवत औदार्य दाखवले. परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते अरिंदम बागची यांनी रविवारी ही माहिती दिली.

भारताकडून पाठवण्यात येणाऱ्या मानवतावादी मदतीमध्ये द्रव आणि वेदनाशामक औषधांचा समावेश आहे. सुमारे 38 टन आपत्ती निवारण सामग्रीमध्ये तंबू, झोपण्याच्या चटया, ताडपत्री, मूलभूत स्वच्छतेच्या वस्तू, पाणी शुद्धीकरण गोळ्या इत्यादींचा समावेश आहे. वैद्यकीय पुरवठ्यामध्ये जीवनरक्षक अत्यावश्यक औषधे आणि आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितींना तोंड देण्यासाठी संरक्षणात्मक आणि शस्त्रक्रियेच्या वस्तूंचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. युनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क एजन्सीमधील (युएनआरडब्ल्यूए) योगदानाद्वारे भारत गाझापट्टी आणि पॅलेस्टिनी निर्वासितांना मदत करत आहे.
‘भारताने पॅलेस्टाईनमधील लोकांना मानवतावादी मदत पाठवली आहे. पॅलेस्टाईनमधील लोकांसाठी अंदाजे साडेसहा टन वैद्यकीय मदत आणि 32 टन आपत्ती निवारण साहित्य घेऊन हवाई दलाचे सी-17 हे मालवाहू विमान इजिप्तमधील अल-अरिश हवाई तळावर रवाना झाल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर सांगितले.
गाझा येथील रुग्णालयात झालेल्या नागरिकांच्या मृत्यूबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केल्यानंतर आणि इस्रायल-पॅलेस्टाईन मुद्द्यावर भारताच्या दीर्घकालीन ‘तत्त्वात्मक भूमिकेचा’ पुनऊच्चार केल्यानंतर तीन दिवसांनी भारताने ही मदत पाठवली आहे. भारत पॅलेस्टाईनच्या लोकांना मानवतावादी मदत पाठवत राहील, असे पंतप्रधानांनी गुऊवारी पॅलेस्टाईन प्राधिकरणाचे अध्यक्ष महमूद अब्बास यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान सांगितले होते.
रफाह सीमेवरून ट्रक गाझामध्ये दाखल
शनिवारी मानवतावादी मदत वाहून नेणाऱ्या सुमारे 20 ट्रकना अखेर इजिप्तच्या रफाह सीमा ओलांडून गाझापट्टीमध्ये प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली. तथापि, 20 लाखांहून अधिक लोकांच्या एन्क्लेव्हमधील गरजा यापेक्षा जास्त असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्र्रेयसस यांनी स्पष्ट केले होते.
जवळपास साडेपाच हजार जणांचा मृत्यू
7 ऑक्टोबर रोजी हमासवर हल्ला केल्यानंतर इस्रायलने त्याला प्रत्युत्तर देण्यास सुऊवात केली. गेल्या पंधरवड्यापासून दिवसेंदिवस हे युद्ध अधिक गडद होत आहे. हमासच्या हल्ल्यात इस्रायलमध्ये 1,400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. याशिवाय गाझामध्ये इस्रायली लष्कराच्या कारवाईत 4,100 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागल्याची आकडेवारी सध्या जाहीर करण्यात आली आहे. एकंदर साडेपाच हजार जणांचा मृत्यू गेल्या पंधरा दिवसात झाल्याचे स्पष्ट होत आहे.









