भारताचे सहा स्पर्धक उपांत्य फेरीत
वृत्तसंस्था / बँकॉक (थायलंड)
22 वर्षांखालील वयोगटाच्या येथे सुरू असलेल्या आशियाई मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचे चार पुरुष आणि दोन महिला स्पर्धकांनी आपल्या वजन गटातून उपांत्य फेरीत प्रवेश करत एकूण सहा पदके निश्चित केली आहेत.
या स्पर्धेमध्ये महिलांच्या विभागात 60 किलो वजन गटात प्रिया, 70 किलो वजन गटात प्रांजल यादव, पुरुषांच्या विभागात 60 किलो गटात हर्ष, 75 किलो गटात निरज, 85 किलो गटात रॉकी चौधरी, 90 किलो वरील गटात इशान कटारिया यांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय नोंदवित उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला आहे.
महिलांच्या 60 किलो वजन गटात भारताच्या प्रियाने जपानच्या कोकुफूचा 5-0 अशा गुणांनी एकतर्फी विजय मिळवित शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. महिलांच्या 70 किलो गटात भारताच्या प्रांजल यादवने चीनच्या झेंगचा 3-2 अशा गुण फरकाने पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे.
पुरुषांच्या 60 किलो वजन गटात भारताच्या हर्षने मंगोलियाच्या इर्डेनीबोर्ल्डचा सरस गुणांच्या आधारे पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळविले आहे. बँकॉकमध्ये 19 वर्षांखालील तसेच 22 वर्षांखालील अशा दोन विभागात आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धा होत आहे. या स्पर्धेसाठी भारताने 40 मुष्टीयोद्धांचा संघ पाठविला आहे. 22 वर्षांखालील वयोगटात भारताच्या भावना शर्माने महिलांच्या 48 किलो गटात तसेच 75 किलो वजन गटात यात्री पटेलने उपांत्य फेरी गाठली असून त्यांची दोन पदके निश्चित झाली आहेत. पुरूषांच्या 75 किलो वजन गटात निरजने चीन तैपेईच्या लिनचा 5-0 असा एकतर्फी पराभव करत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. पुरुषांच्या 85 किलो वजन गटात रॉकी चौधरीने कझाकस्थानच्या झोल्डासखानवर 4-1 अशा गुणांनी मात करत उपांत्य फेरी गाठली आहे. पुरुषांच्या 90 किलो वरील वजन गटात भारताच्या इशान कटारियाने इराणच्या मोसावीचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. मात्र पुरुषांच्या 55 किलो गटात भारताच्या सागरला उपांत्यपूर्व फेरीत हार पत्करावी लागली.









