वृत्तसंस्था/ राऊरकेला
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या पुरुषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत तळाच्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात भारताने जपानचा 8-0 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार हरमनप्रित सिंग आणि अभिषेक यांनी प्रत्येकी 2 गोल नोंदविले.
यजमान भारतीय हॉकी संघाला या प्रति÷sच्या स्पर्धेत क्रॉस ओव्हर सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागल्याने त्यांना उपांत्यपूर्व फेरीपासून वंचित व्हावे लागले होते. विविध स्थानासाठी हॉकी सामने आयोजकांनी खेळविले गेले. गुरुवारी झालेल्या सामन्यात भारतीय संघाने जपानचा एकतर्फी पराभव केला.
भारत आणि जपान यांच्यातील सामन्यात खेळाच्या तिसऱया आणि चौथ्या सत्रामध्ये भारतीय हॉकीपटूंनी प्रत्येकी 4 गोल नोंदविले. या विजयामुळे यजमान भारताचा शनिवारी नवव्या ते बाराव्या स्थानासाठी दक्षिण आफ्रिकेबरोबर सामना खेळविला जाणार आहे. गुरुवारच्या सामन्यात कर्णधार हरमनप्रित सिंगने 46 व्या आणि 59 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर 2 गोल केले. या सामन्यात भारताला 11 पेनल्टी कॉर्नर मिळाले होते. 23 वषीय अभिषेकने 36 व्या आणि 44 व्या मिनिटाला असे दोन्ही मैदानी गोल केले. मनदीपसिंगने 33 व्या मिनिटाला, विवेक सागर प्रसादने 40 व्या मिनिटाला, मनप्रितसिंगने 59 व्या आणि सुगजितसिंगने 60 व्या मिनिटाला गोल नोंदविले. या सामन्यात मध्यंतरापर्यंत गोलफलक कोराच होता. जपानला या सामन्यात पेनल्टी कॉर्नर्सची संधी मिळाली. पण त्याचा त्यांना लाभ घेता आला नाही. जपानला शेवटपर्यंत आपले खाते उघडता आले नाही.
या स्पर्धेतील अन्य क्लासिफिकेशन सामन्यात दक्षिण आफ्रिकेने मलेशियाचा 6-3 अशा गोलफरकाने पराभव केला. त्याचप्रमाणे वेल्सने फ्रान्सचे आव्हान पेनल्टी शूटआऊटमध्ये 2-1 असे संपुष्टात आणले. विश्वचषक हॉकी स्पर्धेतील वेल्सचा हा पहिला विजय आहे. आता वेल्सचा पुढील सामना अर्जेंटिनाशी होणार आहे. अर्जेंटिनाने चिलीचा 8-0 असा एकतर्फी पराभव केला. या स्पर्धेत शनिवारी 9 ते 12 स्थानासाठी सामने होतील.









