एशियन गेम्स : सलामीच्या लढतीत भारताचा धमाकेदार विजय
वृत्तसंस्था/ हांगझाऊ
भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत शानदार सुरुवात केली आहे. ‘अ‘ गटातील पहिल्या सामन्यात उझबेकिस्तानचा 16-0 असा दारूण पराभव केला. चीनच्या हांगझाऊ प्रांतात सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील या सामन्यात रविवारी उझबेकिस्तानने भारतीय हॉकी संघासमोर सपशेल शरणागती पत्करली. गोंगझू कॅनाल स्पोर्ट्स पार्क स्टेडियमवर टीम इंडियाने उझबेकिस्तानला धोबीपछाड देत ग्रुपमध्ये पहिले स्थान पटकावले. भारताकडून ललित उपाध्यायने सर्वाधिक 4 गोल केले. तर वरुण कुमार आणि मनदीप सिंग यांनी प्रत्येकी 3 गोल केले. आता भारताचा पुढील सामना दि. 26 रोजी सिंगापूरशी होणार आहे.
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला भारतीय पुरुष हॉकी संघ गेल्या महिन्यात आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावल्यानंतर हांगझाऊ एशियन गेम्समध्ये सहभागी झाला आहे. या सामन्यात भारताने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला आणि जागतिक क्रमवारीत 66 व्या क्रमांकावर असलेल्या उझबेकिस्तानचा पराभव केला. सामन्याच्या सात मिनिटांनंतर ललित उपाध्यायने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत भारताला 1-0 असे आघाडीवर नेले. यानंतर काही मिनिटांनी वरुण कुमारने दुसऱ्या पेनल्टी कॉर्नरवरुन भारताची आघाडी दुप्पट केली. पहिल्या सत्रात 2-0 अशी आघाडी भारताकडे होती. भारताने दुसऱ्या सत्रामध्येही आपले वर्चस्व कायम ठेवले आणि अभिषेक आणि मनदीप सिंगच्या माध्यमातून दोन झटपट मैदानी गोल केले. ललित उपाध्यायने त्याचा दुसरा आणि संघाचा पाचवा गोल जवळून अगदी सहज केला. त्यानंतर मनदीप सिंगनेच दोन मिनिटांत दोन गोल करत हॅट्ट्रिक पूर्ण केली आणि हाफ टाइमला भारताने 7-0 अशी भक्कम आघाडी घेतली होती. ब्रेकनंतर भारताने आणखी 9 गोल केले आणि सामना 16-0 असा सहज जिंकला. विशेष म्हणजे, संपूर्ण सामन्यात उझबेकिस्तानला एकही गोल नोंदवता आला नाही. संपूर्ण सामन्यात भारताला 14 पेनल्टी कॉर्नर मिळाले, यातील पाच गोल भारताने पेनल्टीवर केले.
भारताकडून ललित उपाध्याय (7, 24, 37 आणि 53 वे मिनिट), मनदीप सिंग (18, 27 आणि 28 वे मिनिट) आणि वरुण कुमार (12, 36, 50 आणि 52 वे मिनिट) यांनी हॅट्ट्रिक केली. याशिवाय, अभिषेक (17), सुखजीत सिंग (42), शमशेर सिंग (43), अमित रोहिदास (38) आणि संजय (57) व्या मिनिटाला यांनी गोल केले.









