वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या पुरूषांच्या हॉकी फाईव्हज विश्वचषक स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. सोमवारी या स्पर्धेतील झालेल्या सामन्यात भारताने जमैकाचा 13-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव केला.
या लढतीमध्ये भारतीय संघातील मनींदरसिंगने 4 गोल नोंदविले. दुसऱ्याच मिनिटाला मनींदरसिंगने पहिला गोल तर तिसऱ्या मिनिटाला दुसरा गोल केला. त्यानंतर त्याने 28 व्या आणि 29 व्या मिनिटाला 2 मैदानी गोल केले. भारतातर्फे मनजीतने 5 व्या आणि 24 व्या मिनिटाला, रहिल मोहम्मदने 16 व्या आणि 27 व्या मिनिटाला, मनदीप मोरने 23 व्या आणि 27 व्या मिनिटाला असे प्रत्येकी 2 गोल केले. उत्तम सिंगने 5 व्या मिनिटाला, रजबर पवनने 9 व्या मिनिटाला तर गुरूज्योत सिंगने 14 व्या मिनिटाला गोल नोंदविले. या सामन्यात भारतीय संघाने सुरूवातीपासूनच आक्रमक चढायांवर भर दिल्याने त्यांनी पहिल्या 6 मिनिटांच्या कालावधीत 4 गोल केले. या सामन्यात शेवटपर्यंत जमैकाला आपले खाते उघडता आले नाही. मध्यंतरापर्यंत भारताने जमैकावर 6-0 अशी आघाडी मिळविली होती.









