वृत्तसंस्था/ कोलकाता
16 वर्षाखालील वयोगटाच्या महिलांच्या सॅफ 16 वर्षाखालील वयोगटातील फुटबॉल स्पर्धेत झालेल्या सामन्यात भारताने नेपाळचा 10-0 अशा गोलफरकाने एकतर्फी दणदणीत पराभव केला. सदर सामना काठमांडूमधील ललितपूरच्या स्टेडियममध्ये खेळवला गेला.
या विजयामुळे भारतीय महिला फुटबॉल संघाचा राऊंड रॉबिन गटातील पुढचा सामना बांगलादेशबरोबर होणार आहे. या गटात बांगलादेशने गुणतक्त्यात पहिले स्थान मिळवले आहे. भारत आणि नेपाळ यांच्यातील सामन्यात अनिता डुंगडुंगने दुसऱ्याच मिनिटाला भारताचे खाते उघडले. पहिल्या 25 मिनिटांच्या कालावधीत भारताने नेपाळच्या हद्दीतच चेंडू अधिक वेळ राखत वर्चस्व राखताना मध्यंतरापर्यंत 6-0 अशी आघाडी मिळवली होती. भारताच्या पर्ल फर्नांडिजने 14 व्या आणि 22 व्या मिनिटाला दोन गोल केले. या स्पर्धेत अंकुशा कुमारीने आतापर्यंत 5 गोल नेंदवले आहेत. या सामन्यात तिने 22 व्या मिनिटाला गोल केला. 12 वर्षीय गुर्लीन कौरने 32 व्या आणि 77 व्या मिनिटाला दोन गोल नोंदवले. गुर्लीन कौरचे या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पदार्पण झाले. बोनीफिलिया शुलाईने 25 व्या मिनिटाला गोल केला. सामन्याच्या उत्तरार्धात नेपाळाच्या मीन माया श्रेष्टाने 46 व्या मिनिटाला आपल्याच गोलपोस्टमध्ये चेंडू लाथाडून भारताला आणखी एक बोनस गोल बहाल केला. गुरमाज कौरने 58 व्या, रेहना जेकॉबने 79 व्या मिनिटाला गोल नोंदवले. या सामन्यात शेवटपर्यंत नेपाळला आपले खाते उघडता आले नाही.









