वृत्तसंस्था/ चेन्नई
रविवारी येथे झालेल्या एचसीएल पुरस्कृत 21 व्या आशियाई कनिष्ठांच्या सांघिक पुरुषांच्या स्क्वॅश स्पर्धेत भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेतील अंतिम लढतीत पाकिस्तानने भारताचा 2-0 असा पराभव करून अजिंक्यपद मिळवले.
सांघिक स्क्वॅशच्या मानांकनात टॉप सिडेड पाक आणि द्वितीय मानांकित भारत यांच्यात अंतिम लढत झाली. पाकतर्फे या अंतिम लढतीत नूर झमान आणि मोहमद हमजा खान यांनी शानदार विजय नोंदवले. नूर झमानने भारताच्या कृष्णा मिश्राचा 12-10, 9-11, 13-11, 11-9 अशा गेम्समध्ये पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात पाकच्या मोहमद हमजा खानने भारताच्या पार्थ अंबानीवर 11-7, 11-5, 11-4 अशा गेम्समध्ये मात केली. या स्पर्धेत महिलांच्या विभागात मलेशियाने विजेतेपद पटकावताना हाँगकाँगचा 2-0 असा पराभव केला. महिलांच्या विभागात भारताने जपानसमवेत संयुक्त तिसऱ्या स्थानासह कास्यपदक घेतले.









