महिलाविषयक चर्चेदरम्यान पाकिस्तानने आळवला काश्मीर राग
वृत्तसंस्था / संयुक्त राष्ट्रसंघ
संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेत महिला, शांतता आणि सुरक्षेच्या मुद्दय़ावर आयोजित चर्चेत पाकिस्तानचे विदेशमंत्री बिलावल भुट्टो झरदारींकडून काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावर भारताने पाकिस्तानला फटकारत ‘अशा दुर्दैवी दुष्प्रचाराला’ प्रत्युत्तर देण्याची गरज वाटत नसल्याचे सुनावले आहे. भुट्टो यांचे विधान हे पोकळ आणि राजकारणाने प्रेरित असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कम्बोज यांनी म्हटले आहे.
केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरसंबंधी पाकिस्तानच्या प्रतिनिधीकडून करण्यात आलेल्या हीन, आधारहीन आणि राजकीयदृष्टय़ा प्रेरित टिप्पणीला भारत फेटाळत आहे. पाकिस्तानच्या खोटय़ा प्रचाराला प्रत्युत्तर देणे आम्हाला आवश्यक वाटत नसल्याचे कम्बोज यांनी सुरक्षा परिषदेतील ‘महिला, शांतता आणि सुरक्षा’ विषयक चर्चेदरम्यान म्हटले आहे.
सुरक्षा परिषदेतील चर्चा महिला, शांतता आणि सुरक्षेच्या अजेंडय़ाला पूर्णपणे लागू करण्यासाठी आमच्या सामूहिक प्रयत्नांना बळ देण्याकरता महत्त्वपूर्ण आहे. आम्ही चर्चेच्या विषयाचा सन्मान करतो आणि वेळेचे महत्त्व ओळखून आहोत. आमचे लक्ष याच विषयावर केंद्रित असायला हवे, असे म्हणत कम्बोज यांनी पाकिस्तानी विदेशमंत्र्यांना लक्ष्य केले आहे.
सुरक्षा परिषदेच्या बैठकीत प्रत्येक देशाची बाजू त्याच्या स्थायी प्रतिनिधीने मांडली. परंतु पाकिस्तानची भूमिका त्याचे विदेशमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मांडली आहे. महिलांशी निगडित चर्चेत बिलावल यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत भारतावर अनेक आरोप केले. या आरोपांवर कम्बोज यांनी बिलावल यांचा नामोल्लेख टाळून प्रत्युत्तर दिले आहे.
पाकिस्तानने केलेले आरोप निरर्थक आहेत. या आरोपांमागे स्पष्ट स्वरुपात राजकीय हेतू आहे. पूर्ण जम्मू-काश्मीर आणि लडाख हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि भविष्यातही राहणा आहे. भारत सर्व शेजारी देशांसोबत चांगले संबंध इच्छितो, परंतु याकरता संबंधित देशाला दहशतवाद रोखावा लागणार आहे तसेच योग्य वातावरण निर्माण करावे लागेल. ही जबाबदारी भारताची नसून पाकिस्तानची असल्याचे कम्बोज यांनी म्हटले आहे.









