हा पाकिस्तानचा डाव असल्याचा स्पष्ट आरोप
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पाकिस्तानच्या मागणीवरून स्थापन करण्यात आलेला सिंधू जलवितरण लवाद भारताने स्पष्टपणे नाकारला आहे. या लवादाची स्थापना हा पाकिस्तानचा कट असून या लवादाला कोणतेही अधिकार नाहीत, अशी स्पष्टोक्ती भारताने केली आहे. या लवादाने दिलेल्या निवाड्याचा कोणताही परिणाम भारतावर होणार नाही. लवादाचा निवाडा मानण्यास भारत बांधील नाही, अशी कठोर भूमिका भारताने घेतली असून सिंध जलवितरण कराराची स्थगिती हटविली जाणार नाही, असे ठामपणे सूचित केले आहे. त्यामुळे पाकिस्तानचा हा प्रयत्न वाया जाणार आहे.
22 एप्रिलला पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाम येथे क्रूर दहशतवादी हल्ला केला होता. त्यानंतर भारताने पाकिस्तानसाठी जीवनरेखा असणारा सिंधू जलवितरण करार स्थगित केला होता. तसेच भारतातून पाकिस्तानात वाहत जाणाऱ्या नद्यांचे पाणी अडवून पाकिस्तानची जलकोंडी करण्याची योजना सज्ज केली होती. भारताने आता या योजनेवर वेगाने काम करण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये वाहून जाणारे 20 टक्के पाणी अडविण्यात भारताला यश मिळाले आहे. परिणामी, पाकिस्तानच्या काही भागांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानने एकतर्फी लवाद स्थापन केला आहे.
लवाद पक्षपाती
हा लवाद पाकिस्तानच्या सांगण्यावरून स्थापन करण्यात आल्याने भारत त्याच्याशी बांधील नाही. लवादाचा अधिकार भारताने मान्य न केल्याने तो लवाद प्रभावहीन ठरला आहे. अशा लवादाने कोणताही निवाडा दिला, तरी तो भारतावर कायदेशीरदृष्ट्या लागू होत नाही. भारताने आपल्या देशाचा हिताचा विचार करून 1960 चा सिंधू जलवितरण करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. तो निर्णय रद्द केला जाणार नाही. पाकिस्तानने कितीही आदळआपट केली, तरी भारत आपल्या निर्णयावर ठाम राहणार आहे, असे भारताने स्पष्ट केले आहे.
चर्चा केवळ दहशतवादावरच
सिंधू जलवितरणासंबंधी भारत आणि पाकिस्तानने चर्चा करावी, अशी सूचना लवादाने केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, पाकिस्तानशी या संदर्भात कोणतीही चर्चा केली जाणार नाही. पाकिस्तानशी केवळ दहशतवाद या एकाच मुद्द्यावर चर्चा केली जाईल. पाकिस्तानने दहशतवाद सोडल्याचा स्पष्ट पुरावा मिळत नाही, तो पर्यंत त्या देशाशी कोणतीही चर्चा केली जाणार नाही. चर्चा केवळ पाकव्याप्त काश्मीर भारताला कसा मिळेल याविषयीच करण्यात येईल, अशी स्पष्टोक्ती भारताने सिंधू जलवितरण कराराच्या संदर्भात केली आहे.









