पाकिस्तान पंतप्रधानांच्या दौऱ्यावेळी मुद्दा उपस्थित : भारत एकतर्फी निर्णय घेऊ शकत नसल्याचा जिनपिंग यांचा दा
वृत्तसंस्था/बीजिंग
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ शनिवारी चार दिवसांच्या चीन दौऱ्यावरून परतले. या दौऱ्यादरम्यान त्यांनी बीजिंगमध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत झालेल्या द्विपक्षीय बैठकीत पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी जिनपिंग यांना काश्मीरशी संबंधित सर्व नवीन अपडेट्सची माहिती दिली. या बैठकीनंतर जारी केलेल्या संयुक्त निवेदनात चीनने जम्मू-काश्मीरमध्ये भारताच्या एकतर्फी कारवाईला विरोध असल्याचे म्हटले आहे. या मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. हा प्रश्न युएन चार्टर आणि ‘युएनएससी’च्या ठरावांनुसार शांततेने सोडवला गेला पाहिजे, असा सल्ला दिला आहे.
चीनने यापूर्वीही वेगवेगळ्या प्रसंगी काश्मीरबाबत अशी वक्तव्ये वेळोवेळी केली असून भारताने नेहमीच विरोध केला आहे. आताही भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर भाष्य करताना काश्मीरबाबत भारताची भूमिका संपूर्ण जगाला माहीत असल्याचे सांगितले. जम्मू-काश्मीर आणि लडाख हे भारताचे अविभाज्य भाग आहेत आणि नेहमीच राहतील. या प्रकरणी कोणत्याही देशाला भाष्य करण्याचा अधिकार नाही, असे कडक शब्दात सुनावले आहे.
जिनपिंग यांच्याशी झालेल्या भेटीनंतर शरीफ म्हणाले की, आपण चीनशी परस्पर सहकार्य आणि गुंतवणूक वाढविण्याबाबत बोललो. पाकिस्तान सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. यानंतर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपण पाकिस्तानसोबत परस्पर भागीदारी आणि संबंध मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. तसेच, पाकिस्तानमध्ये विकास वाढवण्यासाठी चीन कटिबद्ध आहे. या नव्या युगात दोन्ही देश प्रादेशिक शांतता, स्थिरता आणि विकासासाठी एकत्र काम करतील, असे स्पष्ट केले आहे.









