वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत स्वगृही एकदिवसीय विश्वचषक जिंकण्यास सज्ज झालेला आहे. परंतु यजमानांना संभाव्य विजेते असे आपल्याला संबोधायचे नाही. कारण बरेच काही नशिबावर अवलंबून असेल. मला वाटते की, आपण अव्वल चार संघांमध्ये पोहोचणे अधिक महत्त्वाचे आहे. बाकीचे मग नशीब आणि इतर गोष्टींवर अवलंबून असेल, असे मत भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी व्यक्त केले आहे. 4 ते 7 ऑक्टोबरदरम्यान जम्मू तवी गोल्फ कोर्सवर होणार असलेल्या ‘जम्मू काश्मीर ओपन’च्या तिसऱ्या स्पर्धेची घोषणा करताना त्यांनी हे उद्गार काढले.
आम्ही संभाव्य विजेते आहोत असे आताच म्हणू शकत नाही, अर्थातच आमचा संघ खूप चांगला आहे. पण खूप मेहनत करावी लागेल. मला आमचा संघ माहीत आहे, पण इतर संघांबद्दल माहिती नाही. त्यामुळे पटकन उत्तर देणे अयोग्य ठरेल. भारतीय संघाचा विचार करता तो विश्वचषक स्पर्धेत खेळण्यास आणि जिंकण्यास सज्ज झालेला आहे. मात्र त्यांनी मनोभावे खेळले पाहिजे, खेळाचा आनंद घ्यायला हवा, असे कपिल म्हणाले.
भारताने विश्वचषक स्पर्धेच्या आधी मनोबल वाढविताना रविवारी आशिया चषक जिंकला. यजमान श्रीलंकेवर 10 गडी राखून मिळविलेल्या विजयात वेगवान गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. त्यात मोहम्मद सिराजने 21 धावांत 6 बळी घेतले. ‘सिराजची गोलंदाजी पाहणे हे अप्रतिम होते. आजकाल सर्व खंडांमध्ये आमचे वेगवान गोलंदाज सर्व 10 बळी मिळवतात हे पाहून मला खूप आनंद वाटतो. ही अत्यंत महत्वाची बाब आहे’, असे 1983 मध्ये विश्वचषक जिंकलेल्या भारतीय संघाचे कर्णधार राहिलेल्या कपिल देव यांनी सांगितले. एक काळ असा होता जेव्हा आम्ही फिरकीपटूंवर अवलंबून राहायचो. आता तसे ते राहिलेले नाही, त्यामुळे संघाची ताकद वाढली आहे, असे ते म्हणाले.
कपिलनी एक क्रिकेट रसिक या नात्याने कोलंबोत एकतर्फी अंतिम सामन्यापेक्षा चुरसपूरर्ण सामना झालेला त्यांना पाहायचा होता, असे सांगितले. आशिया चषकादरम्यान अक्षर पटेल व श्रेयस अय्यर यांच्यासह काही प्रमुख खेळाडूंना दुखापती झाल्यामुळे विश्वचषकापूर्वी भारताला काही प्रमाणात तंदुरुस्तीविषयी चिंता भेडसावू लागली आहे. ‘कोणत्याही संघातील कोणतेही दोन प्रमुख खेळाडू जखमी झाले, तर त्याचा संघाच्या वाटचालीवर परिणाम होतो. म्हणूनच नशिबाची साथ आवश्यक आहे. कारण जर मुख्य खेळाडू दुखापतग्रस्त झाले, तर संघाचा समतोल बिघडतो’, असे त्यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले.
कपिलनी भारताचा सलामीवीर शुभमन गिलचेही कौतुक केले. ‘हा असा एक तरुण आहे ज्याच्याकडे आपण अपेक्षेने पाहू शकतो. तो भारतीय क्रिकेटचे भविष्य आहे. अशा क्षमतेचा खेळाडू भारतात आहे याचा मला खूप अभिमान वाटतो, असे कपिल देवनी सांगितले. शिखर धवन, रविचंद्रन अश्विन, यजुवेंद्र चहल यासारख्या काही वरिष्ठ खेळाडूंना विश्वचषकासाठी न निवडल्याने वाद सुरू झाला आहे. कपिलनी मात्र विश्वचषकासाठी सर्वोत्तम भारतीय संघ निवडल्याबद्दल अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील निवड समितीचे समर्थन केले आहे.









