वृत्तसंस्था/ हांगझाऊ, चीन
स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिलेला भारतीय महिला हॉकी संघ बुधवारी येथे आशिया चषकातील सुपर 4 टप्प्यातील पहिल्या सामन्यात दक्षिण कोरियाविऊद्ध खेळताना आपली प्रभावी घोडदौड चालू ठेवण्याचा प्रयत्न करेल. भारताने आशिया चषक मोहिमेची सुऊवात दमदारपणे केली आहे. थायलंडचा 11-0 असा पराभव केला आणि नंतर दक्षिण कोरियाविऊद्ध 2-2 असा बरोबरी साधली. त्यानंतर भारतीय संघाने त्यांच्या शेवटच्या सामन्यात सिंगापूरचा 12-0 असा पराभव केला आणि गोल फरकाच्या आधारे गट ‘ब’ मध्ये जपानपेक्षा पुढे अव्वल स्थान मिळवले. बेल्जियम आणि नेदरलँड्समध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकाची पात्रता मिळवण्यासाठी भारत ही गती पुढे नेण्याचा प्रयत्न करेल.
जागतिक क्रमवारीत 10 व्या स्थानावर असलेला जपानविऊद्ध भारताचे पारडे भारी राहील. जपान एफआयएच चार्टमध्ये 12 व्या स्थानावर आहे. कोरियानंतर भारत गुऊवारी जेतेपदाचा दावेदार चीनचा सामना करेल आणि शनिवारी जपानचा सामना करेल. भारतीय संघातील नवनीत कौर आणि मुमताज खान उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. गटस्तरावर त्यांनी प्रत्येकी पाच गोल केले आहेत आणि अंतिम फेरीत स्थान मिळविण्यासाठी संघाची लढाई सुरू असताना या दोघांकडून अशी कामगिरी कायम राहील अशी अपेक्षा आहे. नवनीत, मुमताज आणि लालरेमसियामी सिंगापूरविऊद्धच्या सामन्यात मोकाट सुटल्या. त्यांनी आलेल्या संधींचा फायदा घेतला. नवनीत आणि मुमताजने सिंगापूरवरील 12-0 विजयात प्रत्येकी एक हॅट्ट्रिक केली. मिडफिल्डर्स नेहा, उदिता, शर्मिला आणि ऋतुजा पिसाळ यांनीही संघासाठी चमकदार कामगिरी केली.
सुपर 4 टप्प्यात भारत, चीन, जपान आणि दक्षिण कोरिया एकमेकांविऊद्ध एकदा खेळतील. अव्वल दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील, तर इतर दोन संघ तिसऱ्या व चौथ्या स्थानासाठी खेळतील. भारताने सुपर 4 टप्प्यात चांगली कामगिरी करत प्रवेश केला आहे, तर दक्षिण कोरियाने त्यांच्या गटस्तरावर दोन विजय नोंदविले आहेत आणि एक पराभव पत्करला आहे. महत्त्वाचे म्हणजे दोन्ही संघांमधील गेल्या पाच सामन्यांमध्ये भारताने तीन वेळा विजय मिळवलेला आहे, तर कोरियाने एक विजय मिळवलेला आहे. एक सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे भारताला मानसिक आघाडी मिळेल. भारताचे प्रशिक्षक हरेंद्र सिंग गटस्तरावरील संघाच्या कामगिरीवर खूश आहेत. ‘संघाने स्पर्धेची सुऊवात ज्या पद्धतीने केली आहे त्यावर आम्ही समाधानी आहोत. खेळाडूंनी शिस्त राखून चांगली इच्छाशक्ती दाखवली आहे आणि आक्रमक पद्धतीने संधींचा फायदा घेतला आहे’, असे ते म्हणाले.
‘गटस्तराने आम्हाला वेग वाढवण्यासाठी आणि वेगवेगळ्या संघांविरुद्ध स्वत:ची चाचणी घेण्यासाठी एक चांगले व्यासपीठ दिले. तथापि, कोरिया, चीन आणि जपान यासारख्या बलाढ्या प्रतिस्पर्ध्यांचा सामना करावा लागणारे असल्याने सुपर 4s टप्पा हे पूर्णपणे वेगळे आव्हान असेल. असे सिंग म्हणाले. संघाचे लक्ष त्याच्या रचनेवर, भक्कम बचावावर आणि संधींचे रूपांतर गोलमध्ये करण्यावर असेल. ‘आम्हाला माहित आहे की, या स्तरावर चुकांना फारशी जागा नाही, म्हणून सातत्य आणि संयम महत्त्वाचा असेल’, असे प्रशिक्षकांनी सांगितले. भारताला सर्वांत मोठा धोका जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या चीनपासून आहे.









