वृत्तसंस्था/ भावनगर (गुजरात)
पुढील महिन्यात होणाऱ्या एएफसी महिला फुटसाल आशियाई चषक पात्रता स्पर्धेच्या तयारीसाठी भारतीय राष्ट्रीय महिला फुटसाल शिबिर भावनगर, गुजरातमध्ये जोरात सुरू आहे. येणारे 2025 हे वर्ष भारतीय फुटसालच्या दृष्टीने एक नवीन पहाट आणेल. कारण पात्रता फेरीच्या माध्यमातून महिलांच्या खेळात देशाचे स्पर्धात्मक पदार्पण होईल.
दोन वर्षांपूर्वी भारतीय पुऊष फुटसाल संघाने ताजिकिस्तानमध्ये झालेल्या एएफसी फुटसाल आशियाई चषक पात्रता स्पर्धेत पदार्पण केले होते. तिन्ही सामने गमवावे लागले असले, तरी भारताने 10 गोल केले होते आणि वेगवान फुटसाल खेळून समाधानकारक प्रभाव पाडला होता. त्यावेळी संघाचे मुख्य प्रशिक्षक जोशुआ स्टॅन वाझ होते. वाझ हेच आंतरराष्ट्रीय पदार्पणात महिला संघाला मार्गदर्शन करतील. भारताचा सामना हाँगकाँग (15 जानेवारी), इंडोनेशिया (17 जानेवारी) आणि किर्गिझ प्रजासत्ताक (19 जानेवारी) यांच्याशी इंडोनेशियातील योग्याकार्तामध्ये होणार आहे.
नोव्हेंबरच्या सुऊवातीला निवड चाचणीत सहभागी झालेल्या 100 हून अधिक खेळाडूंमधून छाटणी करून निवडण्यात आलेले 18 खेळाडू सध्या तयारीच्या अंतिम टप्प्यात आहेत. शिबिराचा पहिला टप्पा 25 नोव्हेंबरला संपला, तर दुसरा टप्पा 15 डिसेंबरला सुरू झाला आहे. भावनगर शिबिरातून बोलताना मुख्य प्रशिक्षक वाझ यांनी सांगितले की, आम्ही शिबिरांच्या दोन टप्प्यांमधील विश्रांतीदरम्यान मुलींना फिटनेस कार्यक्रम दिला होता. त्या चांगल्या स्थितीत परतल्या आहेत. त्यांनी त्यांचा फिटनेस कायम ठेवला आहे. आम्ही आमच्या रणनीतीवर, खास करून आक्रमक आणि बचावात्मक खेळ कसा करायचा त्या पद्धतीवर काम करत आहोत. परंतु स्पर्धेपूर्वीच्या पुढील अडीच आठवड्यांत आणखी बरेच काम करायचे आहे, असे ते म्हणाले.
अनेक शिबिरार्थींना, प्रामुख्याने फुटबॉल खेळाडूंना, स्पर्धात्मक फुटसालचा पूर्वी अनुभव नव्हता आणि त्यांना इनडोअर कोर्टवर खेळण्याशी जुळवून घ्यावे लागले. तथापि, इतक्या कमी वेळेत त्यांनी या खेळावर पकड मिळविल्याबद्दल आणि सुऊवातीला अपेक्षा केली होती त्याहून त्या चांगली कामगिरी करत असल्याबद्दल वाझ यांनी आनंद व्यक्त केला आहे.









