पंतप्रधानांची ‘मन की बात’ : एआय, इस्रो, आरोग्य सल्ला, महिला सक्षमीकरणावर भाष्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 फेब्रुवारी रोजी आपल्या मासिक रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’च्या 119 व्या भागातून देशाला संबोधित केले. या भागात पंतप्रधान मोदींनी इस्रोच्या 100 व्या प्रक्षेपणाच्या यशाचा उल्लेख केला. याला भारताच्या अंतराळ विज्ञानातील एक मोठी उपलब्धी असे म्हटले. यासोबतच, त्यांनी एआयमधील (कृत्रिम बुद्धिमत्ता) भारताची जलद प्रगती आणि महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला. त्याचबरोबर आरोग्यविषयक सल्लेही दिले.
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात इस्रोच्या 100 व्या प्रक्षेपणाचा उल्लेख करून केली. ते म्हणाले की, ही केवळ एक संख्या नाही तर भारताने अवकाश विज्ञानात नवीन उंची गाठण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. इस्रोने आतापर्यंत 460 उपग्रह प्रक्षेपित केले आहेत, ज्यात इतर अनेक देशांचे उपग्रहही समाविष्ट आहेत. इस्रोच्या यशात सहभागी असलेल्या महिला शक्तीच्या योगदानाचेही त्यांनी कौतुक केले.
एआय मध्ये भारताची प्रगती
पंतप्रधानांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रातील भारताच्या प्रगतीवरही प्रकाश टाकला. ते म्हणाले की, अवकाश क्षेत्र असो किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता, भारतातील तरुण दोन्ही क्षेत्रात वेगाने प्रगती करत नवीन उंची गाठत आहेत. एआयला भविष्यातील तंत्रज्ञान मानून त्यांनी त्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि तरुणांना त्यात सक्रिय सहभाग घेण्यास प्रोत्साहित केले.
महिला सक्षमीकरण, आंतरराष्ट्रीय महिला दिन
पंतप्रधान मोदींनी 8 मार्च रोजी येणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाबाबतही चर्चा केली. ते म्हणाले की, भारतीय परंपरेत मुलींचा आदर करणे सर्वोपरि राहिले आहे आणि विविध विषयांच्या देवी रूपांना मान्यता देण्यात आली आहे. त्यांनी संविधान सभा सदस्य हंसा मेहताजींचा उल्लेख करत त्यांच्या योगदानाचे स्मरण केले.
राष्ट्रीय विज्ञान दिन
पंतप्रधानांनी आगामी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्याचे आवाहनही केले. तरुणांना विज्ञान क्षेत्रात अधिक रस घेण्यास प्रोत्साहित केले. ते म्हणाले की, भारताची विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगती जगासाठी प्रेरणादायी आहे आणि यामध्ये तरुणांची भूमिका महत्त्वाची आहे, असे ते म्हणाले.
लठ्ठपणा कमी करण्यासाठी तेलाचा वापर कमी करा!
तंदुरुस्त आणि निरोगी भारत बनवण्यासाठी आपल्याला लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करावा लागेल. एका अभ्यासानुसार, आज दर आठपैकी एक व्यक्ती लठ्ठपणाच्या समस्येने ग्रस्त आहे. गेल्या काही वर्षात लठ्ठपणाच्या घटनांमध्ये दुप्पट वाढ झाली आहे. परंतु त्याहूनही चिंताजनक बाब म्हणजे मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या चौपट वाढली आहे. या समस्येवर मुख्य उपाय म्हणजे तेलाचा वापर कमी करणे. दरमहा 10 टक्के कमी तेल वापरल्यास हा लठ्ठपणा कमी करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल असेल, असेही पंतप्रधान म्हणाले.









