केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वैज्ञानिक प्रकाशनांच्या जागतिक मानांकनात भारत आता तिसऱया स्थानावर पोहोचला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी मंत्रालयाच्या कामकाजाच्या समीक्षेनंतर याची माहिती दिली आहे. अमेरिकेच्या नॅशनल सायन्स फौंडेशनच्या (एनएसएफ) विज्ञान आणि इंजिनियरिंग निर्देशांक 2022 च्या अहवालानुसार वैज्ञानिक प्रकाशनांमध्ये जागतिक स्तरावर भारताची स्थिती 2010 मधील सातव्या स्थानावरून आता तिसऱया स्थानापर्यंत सुधारली आहे.
भारतातील संशोधनपत्रांची संख्या 2010 मध्ये 60,555 इतकी होती. 2020 मध्ये हे प्रमाण वाढून 1,49,213 झाले असल्याचे जितेंद्र सिंह यांनी सांगितले आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाला आगामी केंद्रीय अर्थसंकलपात मागील वर्षाच्या तुलनेत 20 टक्के अधिक निधी मिळण्याची शक्यता असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱयाकडून सांगण्यात आले.

पेटंट्सची संख्या वाढतेय
विज्ञान आणि इंजिनियरिंगमध्ये पीएचडीच्या संख्येत भारताचे मानांकन तिसऱया क्रमांकाचे झाले आहे. भारतीय पेटंट ऑफिसकडून भारतीय वैज्ञानिकांना मिळणाऱया पेटंटच्या संख्येत मागील 3 वर्षांपासून वृद्धी नोंदली जात आहे. 2018-19 मध्ये 2,511 तर 2019-20 मध्ये 4,003 आणि 2020-21 मध्ये 5,629 पेटंट भारतीय वैज्ञानिकांच्या नावावर नोंद झाले आहेत.
विज्ञान-तंत्रज्ञानासाठी वाढीव तरतूद
मागील अर्थसंकल्पात विज्ञान-तंत्रज्ञान विभागाला 6,002 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. तर विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाला मिळालेल्या एकूण 14,217 कोटी रुपयांच्या तरतुदीच्या तुलनेत हा आकडा 42 टक्के इतका आहे. तर वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागाला 5,636 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला होता. 18 टक्के म्हणजेच 2,581 कोटी रुपयांचा निधी जैवतंत्रज्ञान विभागाला देण्यात आला होता.
जीआयआय मानांकनात मोठी सुधारणा
नॅशनल सायन्स फौंडेशन अमेरिकन प्रशासनाची एक स्वतंत्र यंत्रणा असून ती वैद्यकीय, विज्ञान आणि इंजिनियरिंगच्या सर्व क्षेत्रांमधील मूलभूत संशोधन आणि शिक्षणाला चालना देते. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये देखील भारताच्या जीआयआय मानांकनात मोठी सुधारणा झाली आहे. वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशनकडून जाहीर होणाऱया जीआयआय मानांकनातही भारत 40 व्या स्थानावर पोहोचला आहे. भारत 2014 मध्ये 81 व्या स्थानावर राहिला होता.









