अमेरिका अव्वल, चीन दुसऱया क्रमांकावर
स्टॉकहोम / वृत्तसंस्था
स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिटय़ूटने (एसआयपीआरआय) सोमवारी जगातील प्रमुख सैन्याच्या वार्षिक खर्चाचा अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार 2021 मध्ये जागतिक लष्करी खर्चाने 2.10 लाख कोटी डॉलर्स हा आतापर्यंतचा सर्वाधिक उच्चांक गाठला. तसेच आकडेवारीनुसार सर्वाधिक लष्करी खर्चाच्या बाबतीत अमेरिका आघाडीवर असून चीन दुसऱया आणि भारत तिसऱया क्रमांकावर आहे.
2021 मध्ये लष्करावर सर्वाधिक खर्च करणाऱया पाच देशांमध्ये अमेरिका, चीन, भारत, युनायटेड किंग्डम (यूके) आणि रशिया यांचा समावेश आहे. या 5 देशांनी एकूण खर्चाच्या 62 टक्के खर्च केला. अहवालानुसार, 2021 मध्ये जागतिक लष्करी खर्च 0.7 टक्क्यांनी वाढून 2,113 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचला आहे. कोरोना महामारीनंतर आर्थिक संकटातही लष्करी खर्च विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. महागाईमुळे विकासदर मंदावला होता. तरीही, लष्करी खर्च 6.1 टक्क्यांनी वाढल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.
भारताने वाढवले लष्करी बजेट
‘एसआयपीआरआय’च्या निरीक्षणानुसार चार वर्षांपूर्वी म्हणजे 2018 मध्ये भारत पाचव्या स्थानावर होता. त्यावेळी भारताचा एकूण लष्करी खर्च 66.5 अब्ज डॉलर्स इतका होता. या खर्चामध्ये गेल्या चार वर्षात सातत्याने वाढ होऊन 2021 पर्यंत हा खर्च 76.6 अब्ज अमेरिकन डॉलर्स झाला आहे. अर्थातच गेल्या चार वर्षात भारताने आपल्या लष्करी खर्चात 10.1 अब्ज डॉलर्सने (7.74 लाख कोटी रुपये) वाढ केली आहे. अर्थाताच 2020 च्या तुलनेत सरकारने 0.9 टक्क्यांनी सुरक्षाविषयक खर्चात वाढ केली आहे. चीन आणि पाकिस्तानसोबत सुरू असलेला तणाव आणि सीमा विवाद यामुळे भारताने लष्करी बजेटमध्ये वाढ केली आहे. 2021 च्या लष्करी बजेटमध्ये स्वदेशी शस्त्रास्त्र उद्योगाला बळकटी देण्यासाठी आणि आत्मनिर्भरता वाढवण्यासाठी सुरक्षाविषयक बजेटच्या 64 टक्के निधीची तरतूद करण्यात आली होती.
अमेरिकेचा लष्करी खर्च 2021 मध्ये 801 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. हा खर्च 2020 च्या तुलनेत 1.4 टक्क्यांनी कमी आहे. 10 वर्षांमध्ये अमेरिकेने लष्करी संशोधन आणि विकासासाठी बजेट 24 टक्क्यांनी वाढवले आ†िण शस्त्रास्त्रांच्या खरेदीवरील खर्च 6.4 टक्क्यांनी कमी केला. दुसऱया क्रमांकावर असलेल्या चीनने संरक्षणासाठी 293 अब्ज अमेरिकन डॉलर्स खर्च केले आहेत. 2020 च्या तुलनेत हा खर्च 4.7 टक्क्यांनी अधिक आहे. ब्रिटनने गेल्या वषी संरक्षणावर 68.4 अब्ज डॉलर्स खर्च केले, जे 2020 च्या तुलनेत 3 टक्क्यांनी जास्त आहे.
युद्धामुळे वाढला रशिया, युपेनचा खर्च
दोन महिन्यांपासून युपेनवर हल्ला करणाऱया रशियाने संरक्षण खर्चात पाचवे स्थान कायम ठेवले आहे. 2021 मध्ये रशियाने आपला लष्करी खर्च 2.9 टक्क्यांनी वाढवून 65.9 अब्ज डॉलर्स इतका केला. तसेच युक्रेनविरोधात युद्ध सुरू झाल्यापासून रशियाने लष्करावर 20 अब्ज डॉलर्सहून अधिक खर्च केले आहेत. युपेनने 2021 मध्ये त्याच्या सैन्यावर 5.9 अब्ज डॉलर्स खर्च केले असून ते रशियाच्या बजेटच्या दहाव्या भागापेक्षा कमी आहे. तसेच रशियासोबतच्या युद्धादरम्यान युपेनने मार्चमध्ये सुमारे 10 अब्ज डॉलर सैन्यावर अतिरिक्त खर्च केले. या व्यवहारांमध्ये नाटो आणि अमेरिकेने युक्रेनला उघडपणे मदत केली.









