वृत्तसंस्था/ दमाम (सौदी अरेबिया)
2023 साली होणाऱया 17 वर्षाखालील वयोगटाच्या आशिया फुटबॉल फेडरेशनच्या आशिया चषक (एएफसी) फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय फुटबॉल संघाने आपले तिकीट आरक्षित केले. या स्पर्धेसाठी येथे सुरू असलेल्या पात्र फेरीच्या स्पर्धेत अंतिम सामन्यात भारताला यजमान सौदी अरेबियाकडून हार पत्करावी लागली असली तरी त्यांनी इतर सामन्यातील कामगिरीच्या जोरावर आपली पात्रता सिद्ध केली.
2023 साली होणाऱया एएफसी चषक 17 वर्षाखालील वयोगटाच्या फुटबॉल स्पर्धेसाठी सौदी अरेबियात पात्र फेरीची स्पर्धा खेळविली जात होती. या पात्र फेरीच्या स्पर्धेत एकूण 10 विविध गटात संघांचा समावेश करण्यात आला होता. पात्र फेरीसाठी दुसऱया क्रमांकाच्या सहा संघांची निवड करण्यात आली. त्यामध्ये भारताचा समावेश झाला. पात्र फेरीच्या स्पर्धेत भारताने तीन सामने जिंकले. पहिल्या सामन्यात भारतीय फुटबॉल संघाने मालदीवचा 5-0, दुसऱया सामन्यात कुवेतचा 3-0 तर तिसऱया सामन्यात म्यानमारचा 4-1 असा पराभव केला. रविवारी झालेल्या शेवटच्या सामन्यात यजमान सौदी अरेबियाने भारतावर 2-1 असा निसटता विजय मिळविला.
सौदी अरेबिया आणि भारत यांच्यातील या सामन्यात सहाव्या मिनिटाला भारतीय संघातील टी. गंगातेने चेंडूवर ताबा मिळवित पेनल्टी परिसरात मुसंडी मारली. पण शेवटच्या क्षणी त्याचा फटका गोलपोस्टच्या बाहेरून गेल्याने भारताला आपले खाते उघडता आले नाही. 14 व्या मिनिटाला पुन्हा भारताने गोल करण्याची संधी गमावली. यजमान सौदी अरेबियाने पहिल्या सत्रातील 45 मिनिटांच्या कालावधीत गोल करण्याच्या अनेक संधी मिळविल्या होत्या. पण भारतीय गोलरक्षक साहिलने तसेच बचावफळतील मुकुल पनवारने भक्कम बचाव करत सौदी अरेबियाला खाते उघडण्यापासून रोखले. सौदी अरेबियातर्फे तलाल हाजीने 20 यार्ड अंतरावरून फ्रि किकवर आपल्या संघाचे खाते उघडले. 58 व्या मिनिटाला पेनल्टी किकवर हाजीने सौदी अरेबियाचा दुसरा गोल केला. सामना संपण्यास एक मिनिट बाकी असताना भारताच्या गंगातेने आपल्या संघाचा एकमेव गोल नोंदविल्याने सौदी अरेबियाने हा सामना 2-1 अशा गोलफरकाने जिंकला.









