400 किलोमीटर अंतरापर्यंतच्या शत्रूच्या विमानाला नष्ट करू शकणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत दीर्घ पल्ल्यापर्यंत जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या सुरक्षा यंत्रणेची निर्मिती करण्याच्या तयारीत आहे. ही यंत्रणा 400 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावरील शत्रूच्या विमानाला नष्ट करण्यास सक्षम असणार आहे. या यंत्रणेला एलआरएसएएम म्हणजेच लाँग रेंज सरफेस टू एअर मिसाइल नाव देण्यात आले आहे.
तीन स्तरीय या क्षेपणास्त्र यंत्रणेच्या निर्मितीचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाच्या अधीन असून याला लवकरच मंजुरी मिळू शकते. भारत या यंत्रणेच्या निर्मितीकरता 20 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.
एलआरएसएएम संरक्षण यंत्रणा विकसित झाल्यावर भारत शत्रूचे ड्रोन अन् लढाऊ विमानांना आकाशातच लक्ष्य करू शकणार आहे. अशाप्रकारचे स्वदेशी तंत्रज्ञान केवळ निवडक देशांकडेच आहे. या क्षेपणास्त्र यंत्रणेत जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचे तीन स्तर असतील, ज्याद्वारे वेगवेगळ्या पल्ल्यांपर्यंत लक्ष्याला नष्ट करता येणार आहे. कमाल मारक पल्ला 400 किलोमीटर असणार आहे.
भारताने यापूर्वी इस्रायलसोबत मिळून मीडियम रेंजची क्षेपणास्त्र यंत्रणा एमआरएसएएम निर्माण केली आहे. या यंत्रणेचा मारक पल्ला 70 किलोमीटर आहे. आता यानंतर लाँग रेंज एअर डिफेन्स सिस्टीम एलआरएसएएम विकसित करण्याची तयारी आहे.
भारताने अलिकडेच रशियाकडून एस-400 क्षेपणास्त्र यंत्रणा खरेदी केली आहे. रशिया आणि भारताने ऑक्टोबर 2018 मध्ये एस-400 च्या पुरवठ्यासंबंधी करार केला होता. ही क्षेपणास्त्र यंत्रणा 4 विविध क्षेपणास्त्रांनी युक्त असून जी शत्रूच्या युद्धनौका, ड्रोन, विमान आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांना 400 किलोमीटरच्या अंतरावर लक्ष्य करू शकते.
भारतात डीआरडीओने जमिनीवरून डागण्यात येणाऱ्या आणि युद्धनौकेवरून डागण्यात येणाऱ्या हवाई सुरक्षा यंत्रणांना विकसित केले आहे. भारताच्या तिन्ही संरक्षण दलांकडे सध्या मध्यम पल्ल्याची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रs आहेत.









