पेगॅसससदृश स्पायवेअरची गरज ः 986 कोटी रुपयांची तरतूद ः ग्रीस, इस्रायलच्या कंपन्या शर्यतीत
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारत सरकार पेगॅससारख्या नव्या स्पायवेअरचा शोध घेत आहे. पेगॅससला अमेरिकेच्या प्रशासनाने काळय़ा यादीत सामील केले आहे. तसेच भारतातही पेगॅससह वादग्रस्त ठरल्याने सरकार प्रतिस्पर्धी सॉफ्टवेअर कंपन्यांशी बोलणी करत आहे. या सर्व्हिलान्स कंपन्या भारत सरकारसमोर निविदा सादर करण्याची तयारी करत आहेत.
भारताचे संरक्षण आणि गुप्तचर अधिकारी पेगॅसस तयार करणारी कंपनी एनएसओच्या प्रतिस्पर्धी कंपनीचा शोध घेत आहेत. सरकार नव्या स्पायवेअर कंत्रासाटी 12 कोटी डॉलर्सपर्यंत (986 कोटी रुपये) खर्च करण्यास तयार असल्याचे मानले जात आहे. या स्पायवेअर पुरवठय़ासाठी सुमारे 12 कंपन्या शर्यतीत सामील होऊ शकतात.

ग्रीसचे प्रेडेटर स्पायवेअर
भारतीय अधिकारी ग्रीसची कंपनी इंटेल्लेक्साचे स्पायवेअर खरेदी करण्याचा विचार करत आहेत. या कंपनीने इस्रायलच्या सैन्याच्या माजी अधिकाऱयांची मदत घेत प्रेडेटर नावाचे स्पायवेअर तयार केले आहे. या स्पायवेअरचे नाव यापूर्वीच एका हेरगिरी प्रकरणात घेतले जात आहेत, ज्यात ग्रीसचे हेरगिरी विभाग प्रमुख आणि पंतप्रधानही अडचणीत आले आहेत. मानवाधिकारांचे उल्लंघन होत असलेल्या अनेक देशांमध्ये प्रेडेटर स्पायवेअरचा वापर केला जात आहे. या देशांमध्ये इजिप्त, सौदी अरेबिया, मादागास्कर आणि ओमान यांचा समावेश आहे.
इस्रायली कंपन्यांचे स्पायवेअर
इस्रायली कंपन्यांनी तयार केलेल्या स्पायवेअरमध्ये भारतीय अधिकारी अधिक रुची दाखवत असल्याचे समोर आले आहे. इस्रायलमध्ये सर्वात आधुनिक स्पायवेअर कंपन्या आहेत. तेथील कंपन्या सैन्यासोबत मिळून स्पायवेअरची निर्मिती करतात. स्पायवेअरच्या पर्यायात क्वॉड्रीम आणि कॉग्नाइट देखील सामील आहे. वॉशिंग्टन पोस्टचे पत्रकार जमाल खशोगी यांच्या मृत्यूनंतर क्वॉड्रीम स्पायवेअर सौदी अरेबियाला पुरविण्यास इस्रायलने मंजुरी दिली होती असे समजते. कॉग्नाइटसंबंधी मेटा समुहाने केलेल्या चौकशीत मोठय़ा प्रमाणावर स्पायवेअरच्या गैरवापराची बाब समोर आली होती. यानंतर नॉर्वेच्या सॉवरीन वेल्थ फंडने या कंपनीतील गुंतवणूक काढून घेतली होती. तर अमेरिकेच्या वेरिंट कंपनीने याला स्वतःच्या स्टॉकमधून हटविले होते.
अन्य देशही स्पर्धेत
या दोन्ही कंपन्यांसोबत ऑस्ट्रेलिया, इटली, फ्रान्स, बेलारुस आणि सायप्रसच्या स्पायवेअर कंपन्या देखील स्पर्धेत आहेत. अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्टेलिया आणि न्युझीलंडकडे देखली स्पायवेअर आहे. परंतु तेथे खासगी कंपन्यांनी नव्हे तर देशाच्या गुप्तचर यंत्रणांनीच हे स्पायवेअर विकसित केले आहे.









