
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
रोहित शर्माचा संयम, विराट कोहलीची तीव्रता आणि जसप्रीत बुमराहची भेदक गोलंदाजी यामुळे आज शनिवारी येथे होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील सामन्यात भारताचे पारडे जड वाटत आहे. कागदावर जरी भारत पाकपेक्षा खूप बलवान वाटत असला, तरी भारतीय फलंदाजी डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीचा पहिला स्पेल किती चांगल्या प्रकारे हाताळते यावर बरेच काही अवलंबून असेल.
1 लाख 32 हजार लोक बसू शकतील अशा भव्य स्टेडियवर खेळताना शाहीनला लवकरात लवकर निप्रभ करू पाहणार यात शंका नाही. डेंग्यूनंतर शुभमन गिलची तब्येत ठीक होत आहे आणि कोलंबोमधील आशिया चषकातील सामन्यात जसे ‘पॉवरप्ले’मध्ये अर्धा डझन चौकार हाणतान त्याने शाहीनच्या गोलंदाजीची पिटाई केली होती तशी कामगिरी करण्यास तो सज्ज असेल, तर पाकिस्तानी संघाला खिळखिळे करण्याचे अर्धे काम फत्ते होईल. तो आपले वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करू पाहील आणि त्यामुळे कोहली, श्रेयस अय्यर आणि के. एल. राहुल यांना मधल्या षटकांमध्ये डोलारा उभारण्यासाठी एक चांगला पाया मिळेल.

दर्जेदार फिरकीपटूंच्या कमतरतेमुळे पाकिस्तान मधल्या षटकांत थोडासा कमी पडू शकतो. पाकिस्तानचा उपकर्णधार शादाब खान याने दोन सामन्यांत 16 षटकांत 100 धावा दिल्या आहेत आणि नवा चेंडू हाताळणारा गोलंदाज हसन अलीसह तो भारतीयांसाठी सोपे लक्ष्य बनू शकतो. दुसरा सक्षम फिरकीपटू नसणे हा आतापर्यंतचा पाकिस्तानचा कमकुवत दुवा राहिला आहे. प्रतिकूल हवामानाचा अंदाज असला, तरी या महत्त्वपूर्ण सामन्यात कसलाही अडथळा येऊ नये अशीच क्रिकेट रसिकांची प्रार्थना असेल.
श्रीलंकेविरुद्ध मोहम्मद रिझवानने जबरदस्त कामगिरी केली आणि अब्दुल्ला शफिकने आपला दर्जा दाखविला. सौद शकीलही फॉर्मात आल्यास घातक बनू शकतो. पण पाकिस्तानची फलंदाजी कर्णधार बाबर आझमवर अवलंबून आहे. बाबरची कुलदीप यादवसोबतची लढत सामन्याचे एक वैशिष्ट्या बनू शकते. 2019 मध्ये कुलदीपच्या लेगब्रेकने मँचेस्टरमध्ये बाबरला गोंधळवून टाकले होते. तो बाबर आणि त्याच्या संघासाठी खूप हानिकारक ठरू शकतो. आशिया चषक स्पर्धेतील कोलंबोतील सामना हा त्याचे एक उदाहरण आहे. पण कुलदीपला सामोरे जाण्यासाठी पाकिस्तानला आधी जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजचा पहिला स्पेल पार करावा लागेल।
रिजवान आणि शफीक यांना पुरेपूर माहीत असेल की, बुमराह आणि सिराजला तोंड देणे हे मथीशा पाथिरानाला तोंड देण्यापेक्षा खूप अधिक आव्हानात्मक असू शकते. आर. अश्विन व शार्दुल ठाकूर यापैकी कुणाला खेळवायचे या एकमेव प्रश्नाचे उत्तर भारताला शोधावे लागेल. जर खेळपट्टी फलंदाजीचे नंदनवन असेल, तर शार्दुल हा एक चांगला पर्याय आहे. पण जर चेंडू थोडासा वळत असेल, तर अश्विन हा अधिक व्यवहार्य पर्याय आहे.
वास्तविक, विश्वचषक स्पर्धेत भारत व पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत झालेल्या सात लढतीत भारताने सामना संपण्यापूर्वीच त्याचा निकाल व आपले वर्चस्व स्पष्ट करून दाखविलेले आहे. तरीही विश्वचषकातील भारत-पाक सामन्याचे एक वेगळे आकर्षण असते. अशाच सामन्यांतील 1992 मध्ये सिडनी येथे किरण मोरेच्या आनंदोत्सवानंतर मियांदादने केलेली मजेदार नक्क्ल किंवा वेंकटेश प्रसादचा आमिर सोहेलला पॅव्हेलियनचा रस्ता दाखविताना व्यक्त झालेला राग अथवा सेंच्युरियन येथे हरभजन सिंग आणि मोहम्मद युसूफ यांच्यात झालेला शाब्दिक संघर्ष हे सर्व क्षण अविस्मरणीय बनलेले आहेत.
आजच्या सामन्यात कुठलाही संघ पराभूत झाला म्हणून त्याच्या विश्वचषकातील मोहिमेचा शेवट होणार नाही. कारण ही हानी भरून काढण्यासाठी आणखी सहा सामने असतील. पण जर भारताने मागील सात सामन्यांप्रमाणे विजय मिळवला, तर ते येथील प्रत्येक रसिकाला विलक्षण समाधान देऊन जाईल.
संघ : भारत-रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन इशान किशन, सूर्यकुमार यादव.
पाकिस्तान : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिकार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हॅरिस रौफ, हसन अली, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसिम.
सामन्याची वेळ : दुपारी 2 वा.









