आयसीसी टी 20 विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर : 9 जून रोजी पारंपारिक प्रतिस्पर्धी आमनेसामने
वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेचा रोमांच संपल्यानंतर आता नव्या वर्षात जगभरातील क्रिकेटप्रेमींना टी 20 विश्वचषक स्पर्धेचा थरार पहायला मिळणार आहे. आयसीसी टी 20 विश्वचषक स्पर्धा 1 ते 29 जून या कालावधीत वेस्ट इंडिज व अमेरिकेत होणार आहे. भारतीय संघ या स्पर्धेतील पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे. यानंतर भारत-पाकिस्तान महामुकाबला 9 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये होईल. आयसीसीने शुक्रवारी स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. दरम्यान, 20 संघाचा स्पर्धेत सहभाग असून पाच गटात संघाचे विभाजन करण्यात आले आहे.
पहिला सामना 1 जून रोजी अमेरिका आणि कॅनडा यांच्यात खेळला जाईल. तर टी 20 विश्वचषकाचा अंतिम सामना 29 जून रोजी होणार आहे. स्पर्धेतील गट टप्प्यातील सामने 1 ते 18 जून दरम्यान खेळवले जातील. यानंतर 19 ते 24 जून दरम्यान सुपर-8 सामने होणार आहेत. 26 आणि 27 जून रोजी उपांत्य फेरीचे सामने गयाना व त्रिनिदाद येथे खेळवले जातील आणि शेवटी 29 जून रोजी बार्बाडोस येथे वर्ल्डकप फायनल खेळली जाणार असल्याचे आयसीसीने स्पष्ट केले आहे.
स्पर्धेत 20 संघाचा सहभाग
आयसीसी टी 20 विश्वचषक स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार असून त्यांची ‘अ ते ‘ड‘ अशी पाच गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटात पाच संघ ठेवण्यात आले आहेत. टीम इंडियाचा अ गटात समावेश असून या गटात भारतासह पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा आणि अमेरिका यांचा समावेश आहे. भारतीय संघ ग्रुप स्टेजचे सर्व सामने अमेरिकेत खेळेल, ज्यामध्ये पहिले तीन सामने न्यूयॉर्कमध्ये आणि शेवटचा सामना फ्लोरिडामध्ये होईल.
टीम इंडियाचे वेळापत्रक –
- 5 जून – भारत वि आयर्लंड, न्यूयॉर्क
- 9 जून – भारत वि पाकिस्तान, न्यूयॉर्क
- 12 जून – भारत वि अमेरिका, न्यूयॉर्क
- 15 जून – भारत वि कॅनडा, फ्लोरिडा
गटाची विभागणी –
अ गट – भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
ब गट – इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
क गट – न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
ड गट – दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड, नेपाळ.









