विश्वचषकाचे टाईमटेबल जाहीर झाल्यानंतर महत्वाच्या शहरामधील हॉटेल दरात मोठी वाढ
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेल आणखी तीन महिन्यांचा कालावधी बाकी आहे. पण वर्ल्डकपचे टाईमटेबल जाहीर झाल्यापासून अहमदाबादसह मोठ्या शहरातील हॉटेलच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे प्रेक्षकांना वर्ल्डकप चांगलाच महागात पडण्याची शक्यता आहे. यंदाची आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धा 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत आयोजित केला जाणार आहे. ही संपूर्ण स्पर्धा 46 दिवसांची असेल. 5 ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये गतविजेता इंग्लंड आणि गत उपविजेता न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने विश्वचषकाची सुरुवात होईल. दरम्यान, विश्वचषकाचा पहिला सामना 5 ऑक्टोबरला नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. यानंतर 15 ऑक्टोबरला भारत-पाक सामना आणि त्यानंतर अंतिम सामनाही येथेच होणार आहे. 15 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यासाठी चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता आहे. यामुळे अहमदाबादमधील पंचतारांकित हॉटेलसह लहान-मोठ्या हॉटेलचे 13 ते 16 ऑक्टोबरदरम्यानचे बुकिंग आधीच फुल झाले आहे. मॅचचे दिवस जवळ येतील तसे रुमचे भाडे आणखीन वाढण्याची शक्यता असल्याचे आयटीसी अहमदाबादचे व्यवस्थापक मॅकेन्झी यांनी सांगितले. उद्घाटन समारंभ आणि न्यूझीलंड व इंग्लंड यांच्यातील पहिल्या सामन्यासाठी इंग्लंड आणि प्रमुख ट्रॅव्हल एजन्सीद्वारे बुकिंग करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. याशिवाय, भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व दक्षिण आफ्रिका यांचे सामने ज्या शहरात आहेत, त्या शहरातील हॉटेलच्या दरात पाच पटीने वाढ झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामध्ये महत्वाच्या संघातील ट्रॅव्हल एजन्सीनी बुकिंगची सुरुवात केली असल्याने चाहत्यांना याचा मोठा फटका बसणार आहे.









