आशिया चषक हॉकी स्पर्धेसाठी पाकचा भारतात येण्यास नकार : हॉकी इंडियाचे बांगलादेशला आमंत्रण
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
आशिया चषक हॉकी स्पर्धा 27 ऑगस्ट ते 7 सप्टेंबरपर्यंत बिहारच्या राजगीरमध्ये आयोजित करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्ताव भारतात येऊन हॉकीचा सामना खेळण्यासाठी येण्यास पाकिस्तानच्या संघाने नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हॉकीचा सामना रद्द होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. विशेष म्हणजे, बिहारमधील राजगीर येथे होणारी ही स्पर्धा नेदरलँड्स आणि बेल्जियम यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱ्या 2026 च्या हॉकी वर्ल्ड कपच्या दृष्टिने महत्त्वपूर्ण आहे. ही स्पर्धा जिंकणारा संघ हॉकी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहे. पाकिस्तानी खेळाडूंना या स्पर्धेसाठी व्हिसा देण्याची तयारी भारत सरकारने दर्शवली होती. पण पाकिस्तान हॉकी महासंघाने सुरक्षिततेच्या कारणास्तवर भारतात येण्यास नकार दिला आहे.
त्यानंतर भारतीय हॉकी महासंघाने पाकिस्तानच्या जागी बांगलादेशच्या हॉकी संघाला या स्पर्धेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे. दरम्यान, जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यात निष्पाप भारतीय पर्यटकांना ठार केल्यावर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध अधिक ताणले गेले आहेत. याचा प्रत्येक क्षेत्राप्रमाणे खेळ जगतात सुद्धा प्रभाव पडला. त्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड चॅम्पियन्स लेजेंड्स स्पर्धेत भारताने पाकिस्तान विरुद्ध खेळण्यास नकार देत थेट स्पर्धेतून माघार घेतली. पाकिस्तान संघ भारतात येऊन सामने खेळण्यास तयार नाही म्हणून सप्टेंबर महिन्यात होणारा आशिया कप 2025 हा अरब अमिरातमध्ये खेळवण्यात येणार आहे.
स्पर्धेत आठ संघाचा सहभाग
आशिया कप हॉकी स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्याशिवाय चीन, जपान, मलेशिया, दक्षिण कोरिया आणि ओमान आणि तैवान या आठ संघांचा समावेश आहे. पाकिस्तान हॉकी संघ या स्पर्धेत सहभागी होणार नसल्यामुळे आता त्यांच्या जागी बांगलादेश संघाच्या या स्पर्धेत एन्ट्री होणार असल्याचे दिसत आहे.









