भारतीय फलंदाजीसमोर पाकच्या वेगवान माऱ्याचे आव्हान, इशान किशन की राहुल यावरही घ्यावा लागेल निर्णय
वृत्तसंस्था/ कोलंबो
आशिया चषकातील सुपर फोर स्तरावरील बहुप्रतिक्षित सामन्यात आज रविवारी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान आणि भारत पुन्हा आमने सामने येणार आहे. या स्पर्धेत पाकिस्तानचा सामना करण्याची रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाची ही दुसरी खेप आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाला पाकविरूद्ध शक्य तितका सर्वोत्कृष्ट संघ उतरवावा लागणार असून के. एल. राहुल आणि इशान किशन यांच्यापैकी कुणाची निवड करायची हा गुंता सोडवावा लागणार आहे.
पावसामुळे सामना रद्द करण्याचा प्रसंग येऊ नये याकरिता सोमवारचा दिवस राखीव ठेवण्याचा वादग्रस्त निर्णय घेण्यात आलेला असला, तरी पाऊस या सामन्यापासून दूर राहील अशी आशा भारतीय संघ व्यवस्थापन बाळगून असेल. राहुलने संघात पुनरागमन केल्याने उपलब्ध पर्यायांची व्याप्ती वाढली आहे. पण त्यामुळे कुणाला वगळायचे ही डोकेदुखीही निर्माण झाली आहे. किशनने वेस्ट इंडिजविरूद्ध तीन आणि गेल्या आठवड्यात पल्लेकेले येथे झालेल्या आशिया चषकातील ‘अ’ गटातील सामन्यात पाकिस्तानविरूद्ध एक अशा चार सामन्यांमध्ये चार अर्धशतके ठोकून सर्वांना प्रभावित केले आहे. शिवाय त्याने सलामीपासून पाचव्या क्रमांकापर्यंत कुठेही आपण फलंदाजी करू शकतो हे दाखवून दिले आहे. किशन हा डावखुरा असल्याने भारतीय फलंदाजीत थोडी विविधताही आणतो.
याउलट राहुल मांडीच्या दुखापतीमुळे आणि शस्त्रक्रियेनंतर सावरण्याच्या प्रक्रियेमुळे यावर्षी मार्चपासून एकही वनडे खेळलेला नाही. असे असले, तरी राहुलच्या पाचव्या स्थानावरील दाव्याकडे दुर्लक्ष करणे कठीण आहे. हा 31 वर्षीय खेळाडू 2019 पासून भारताच्या सर्वांत स्थिर एकदिवसीय फलंदाजांपैकी एक राहिला आहे. पाचव्या क्रमांकावर येऊन त्याने 18 सामन्यांतून 742 धावा जमविलेल्या आहेत. त्याशिवाय तो यष्टिरक्षण करतो. राहुल शुक्रवारी यष्टिरक्षणाच्या सरावातही गुंतलेला दिसला. अशा परिस्थितीत संघ व्यवस्थापनाला कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे. संघाला अपेक्षित संतुलन प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा असेल.
सुपर फोर स्तरावर सुरूवात विजयासह करण्यास भारत उत्सुक असेल. लाहोर येथे बांगलादेशचा 7 गड्यांनी पराभव करून पाकिस्तानने आधीच दोन गुण मिळवले आहेत आणि आणखी एक विजय त्यांना अंतिम फेरीत आरामात पोहोचवेल. भारतालाही तेथे पोहोचायचे असून त्यांना आज प्रभावी पाकिस्तानी गोलंदाजीचा सामना करावा लागेल. रोहित आणि इतर भारतीय फलंदाजांदा शाहीन शाह आफ्रिदीच्या वेगवान ‘इनकमिंग’ चेंडूंपासून सावध राहावे लागेल.
त्याशिवाय वेगवान हरिस रौफ हा सध्या तीन सामन्यांत 9 बळी घेऊन आशिया चषकात गोलंदाजांमध्ये अव्वल स्थानावर आहे आणि तो आफ्रिदीच्या (7 बळी) छायेतून बाहेर आल्यासारखे दिसत आहे. नसिम शाहनेही 7 बळी घेतले आहेत. पाकिस्तानच्य माऱ्याला धार असली, तरी भारताकडेही त्यांना प्रत्युत्तर देण्याची ताकद आहे. नेपाळविरूद्धच्या साखळी सामन्यात न खेळलेल्या जसप्रीत बुमराहचे पुनरागमन भारताच्या गोलंदाजीला बळ देईल, तर मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर हे प्रभावी भूमिका बजावू शकतात. मैदानावर आजची लढत ही तुफानी टक्कर ठरण्याची शक्यता आहे.
संघ-भारत : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा.
पाकिस्तान : बाबर आझम (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, इमाम-उल-हक, सलमान अली आगा, इफ्तिकार अहमद, मोहम्मद रिझवान, मोहम्मद हरिस, शादाब खान, मोहम्मद नवाज, उसामा मीर, फहीम अश्रफ, हरिस रौफ, मोहम्मद वासिम ज्युनियर, नसिम शाह, शाहीन आफ्रिदी, सौद शकील, तय्यब ताहिर (राखीव).