कनिष्ठांची आशिया चषक हॉकी स्पर्धा
वृत्तसंस्था/ सलालाह (ओमान)
येथे सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या कनिष्ठ पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत अ गटातील भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपरिक संघांतील चुरशीचा सामना 1-1 असा गोल बरोबरीत राहिला. या स्पर्धेत भारताने आपली अपराजित घौडदौड कायम राखली आहे.
शनिवारी रात्री झालेल्या या चुरशीच्या सामन्यात दोन्ही संघांकडून दर्जेदार खेळाचे प्रदर्शन घडले. 24 व्या मिनिटाला शारदानंद तिवारीने पेनल्टी कॉर्नरवर भारताचे खाते उघडले. सामन्याच्या मध्यांतरापर्यंत भारताने पाकवर 1-0 अशी आघाडी मिळविली होती. सामन्यातील 44 व्या मिनिटाला बशरत अलीने शानदार गोल नोंदवून पाकला या सामन्यात बरोबरी साधून दिली. हा सामना बरोबरीत राहिल्यानंतर आता भारताने या स्पर्धेच्या गुणतक्त्यात अ गटात तीन सामन्यातून 7 गुणासह दुसरे स्थान मिळविले आहे. या गटात पाकचा संघ आघाडीवर असून त्यांनीही 7 गुण घेतले आहेत. मात्र सरस गोलसरासरीच्या जोरावर पाकने भारताला मागे टाकले आहे.
शनिवारी झालेल्या अन्य एका सामन्यात जपानने चिनी तैपेईचा 10-1 अशा गोल फरकाने एकतर्फी पराभव करत तीन सामन्यातून 6 गुणांसह तिसरे स्थान मिळविले आहे. या स्पर्धेत भारताने सलामीच्या सामन्यात चिनी तैपेईचा 18-0 अशा गोलफरकाने तर त्यानंतर दुसऱ्या सामन्यात जपानचा 3-1 असा पराभव केला होता.
शनिवारच्या सामन्यात भारतीय संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक आणि वेगवान खेळावर जोर देत पाकच्या बचावफळीवर बऱ्यापैकी दडपण आणले होते. पहिल्या 15 मिनिटांच्या कालावधीत भारताने 2 पेनल्टी कॉर्नर्स मिळविले पण ते वाया गेले. पाकलाही या कालावधीत 1 पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण गोलरक्षक अमनदीप लाक्राने भक्कम गोलरक्षण करुन पाकला खाते उघडू दिले नाही. पहिल्या 15 मिनिटांच्या कालावधीत दोन्ही संघांकडून गोल होऊ शकला नाही. मात्र दुसऱ्या सत्रात भारताने आपले खाते उघडले. शारदानंद तिवारीने पेनल्टी कॉर्नरवर हा अप्रतिम गोल केला. सामन्याच्या उत्तरार्धात पाकने आपल्या डावपेचात बदल करत भारतीय बचावफळीवर दडपण आणले. दरम्यान 44 व्या मिनिटाला बशरत अलीने मैदानी गोल करत आपल्या संघाला बरोबरी साधून दिली. शेवटच्या 15 मिनिटांच्या कालावधीत दोन्ही संघांनी बचावात्मक खेळावर अधिक भर दिल्याने हा सामना अखेरीस 1-1 असा बरोबरीत राहिला. या स्पर्धेत भारताचा अ गटातील शेवटचा सामना थायलंड बरोबर होत आहे.









