आशिया चषकातील बहुप्रतीक्षित लढतील लक्ष, रोहित-गिल-कोहलीसमोर पाकच्या वेगवान माऱ्याचे आव्हान
वृत्तसंस्था/ पल्लेकेले
आशिया चषकातील अत्यंत महत्त्वाचा भारत व पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील सामना आज शनिवारी खेळविला जाणार असून यावेळी विराट कोहली हॅरिस रौफविरु द्धच्या त्या जादुई क्षणाची पुनरावृत्ती करण्याची इच्छा बाळगून असेल, तर रोहित शर्मा शाहीन शाह आफ्रिदीच्या इनस्विंगर्सना तोंड देण्यास सज्ज झालेला असेल. विश्वचषक स्पर्धेची झलक वा त्याची तयारी यापेक्षा या सामन्याला खूप महत्त्व आहे. दुपारी 3 पासून या महालढतीला प्रारंभ होईल. मात्र त्यावर पावसाचे सावट असल्याचे सांगण्यात आले.
आशिया चषक स्पर्धा 50 षटकांच्या स्वरुपात परतली असून त्यात सहभागी होणाऱ्या सहापैकी पाच संघांसाठी विश्वचषकाच्या दृष्टीने तयारी करण्याचे हे एक उत्तम माध्यम आहे. पण आयोजक आणि चाहत्यांसाठी भारत विऊद्ध पाकिस्तान हा निव्वळ सामना नाही, तर बहुप्रतीक्षित लढत आहे. मागील ‘टी-20’ विश्वचषकात मेलबर्नवर कोहलीने रौफचा फटकावलेला चेंडू भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या अजूनही स्मृतींत असेल. तर रोहितला बाद करण्यात शाहीन यशस्वी झाल्यानंतर पाकिस्तानी चाहते आनंदित झाले होते. आजचा सामना म्हणजे दोन्ही बाजूंच्या क्रिकेटपटूंसाठी हिरो म्हणून उदयास येण्याची आणखी एक संधी असेल.
तथापि, शनिवारी डोंगराळ कँडी प्रदेशात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने या सामन्याला वेगळेच वळण मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. कर्णधार रोहित, निर्भयी कोहली आणि त्याचा वारसदार शुभमन गिल ही ‘त्रिमूर्ती’ शाहीन, रौफ आणि नसिम शाह यांच्या माऱ्याला तोंड देण्यास सज्ज झालेली आहे. सुरुवातीच्या ‘पॉवर प्ले’दरम्यान भारताच्या या वरच्या फळीला अस्वस्थ करण्यासाठी शाहीन आणि नसिमला ढगाळ वातावरण आणि वाऱ्याची थोडीशी साथ यांची गरज लागेल. विशेषत: गिलला ते मारक ठरू शकते. कारण वेगवान गोलंदाजांविऊद्ध खेळताना त्याच्या पायांची नीट हालचाल होत नसते.
भारत व पाकिस्तान या दोन्ही संघांना मधल्या फळीत समस्या भेडसावत आहेत. भारताची चिंता प्रामुख्याने के. एल. राहुलच्या अनुपस्थितीमुळे वाढली आहे. राहुल किमान पहिल्या दोन सामन्यांना मुकणार आहे. भारत पाकिस्तानविऊद्ध मधल्या फळीत यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशनला मैदानात उतरविण्याचा निर्णय घेऊ शकतो. पण अजूनही त्याच्या स्थानाबाबत अनिश्चितता असून त्याला चौथ्या क्रमांकावर खेळवावे की पाचव्या हे ठरवता आलेले नाही. मात्र किशनच्या समावेशामुळे आणि तो डावखुरा असल्याने भारतीय फलंदाजीला निश्चितच थोडी विविधता मिळेल.
पण झारखंडच्या या यष्टिरक्षकाने त्याच्या भारतीय संघातील कारकिर्दीत कधीही पाचव्या क्रमांकावर फलंदाजी केलेली नाही आणि मधल्या फळीत त्याची सरासरी 22.75 इतकी कमी आहे. त्याला मधल्या फळीत उतरल्यास धावा वाढविण्याच्या आव्हानाचा सामना करावा लागेल. त्यात त्याला फलंदाजीसाठी जास्त षटके मिळणार नाहीत. दुसरीकडे, पाकिस्तानला दुखापतींची चिंता नाही, पण ते सध्याच्या घडीला सर्वांत कमी एकदिवसीय सामने खेळलेल्या संघांपैकी एक आहेत.
2019 च्या विश्वचषकापासून पाकिस्तान फक्त 29 एकदिवसीय सामने खेळला आहे, तर त्याच कालावधीत भारत 57 सामने खेळला आहे. पाकिस्तान 29 पैकी 12 सामने यंदा खेळला आहे. त्यांचा कर्णधार बाबर आझम (689 धावा), फखर झमान (593 धावा) आणि इमाम-उल-हक (361 धावा) हे पहिले तीन खेळाडूच यंदा जास्त चमकलेले असून त्यांना फलंदाजीत चौथ्या क्रमांकापासून सहाव्या क्रमांकापर्यंत समस्या आहे. उसामा मीर, सौद शकील आणि आगा सलमान यांना सातत्य दाखवता आलेले नाही आणि ज्या दिवशी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस येणारा मोहम्मद रिजवान अपयशी ठरतो त्यावेळी ते निप्रभ दिसतात.
अनेकदा डावाला मजबुती आणण्याच्या बाबतीत पाकिस्तानला सातव्या क्रमांकावर फलंदाजीस येणारा इफ्तिकार अहमद आणि आठव्या क्रमांकावर येणारा शादाब खान यांची गरज भासलेली आहे. इफ्तिकारला नेपाळविऊद्ध बढती मिळाली आणि त्याने एकदिवसीय शतक झळकावून दाखविले, तर शादाबने गेल्या आठवड्यात अफगाणिस्तानविऊद्ध केलेल्या मौल्यवान 48 धावांच्या खेळीच्या जोरावर पाकिस्तानने हंबनटोटा येथे एक गडी राखून विजय मिळवला. मुलतान येथे आशिया चषकाच्या सलामीच्या लढतीत रिजवान आणि सलमान यांना नेपाळविऊद्ध मोठी धावसंख्या उभारण्याची संधी मिळाली नाही, कारण बाबर आणि इफ्तिकार यांनी शतके ठोकली.
गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्या पुनरागमनामुळे भारताला बळ मिळाले आहे आणि अलीकडेच झालेल्या आयर्लंडविऊद्धच्या ‘टी-20’ मालिकेत त्यांनी शानदार गोलंदाजी केली होती. पण 50 षटकांच्या सामन्यांत त्यांच्या हातून कशी कामगिरी होते ते पाहण्यास भारतीय व्यवस्थापन उत्सुक असेल. पाकिस्तानविऊद्धच्या सामन्यातील शमीच्या अनुभवाला संघ व्यवस्थापनाकडून प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे. बुमराह, मोहम्मद सिराज व शमी आणि चौथा गोलंदाज म्हणून हार्दिक पंड्या असे समीकरण वापरले जाऊ शकते.
कागदावर भारतीय गोलंदाजी जितकी प्रभावी वाटते तितकेच शाहीन, नसिम आणि रौफ हे पाकिस्तानी वेगवान त्रिकुटही प्रभावी आहे. त्यांनी यावर्षी 49 बळी घेतले असून रौफ 10 सामन्यांत 17 बळींसह आघाडीवर आहे. अशा परिस्थितीत पल्लेकेले स्टेडियमवर भारतीय फलंदाजांच्या कौशल्याचा कस लागू शकतो. कारण तेथील खेळपट्टी गोलंदाजांना चेंडू उसळविण्याच्या बाबतीत मदत करते. भारताला फिरकी विभागातील निवडीवरही लक्ष ठेवावे लागेल. रवींद्र जडेजाचा समावेश पक्का आहे आणि तो सातव्या क्रमांकावर फलंदाजीस येऊ शकतो.
डावखुरे फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांच्यातील कुणाची निवड करायची यावर संघ व्यवस्थापन बराच विचार करू शकते. अक्षर आठव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकणाऱ्या गोलंदाजाचा पर्याय उपलब्ध करतो, तर कुलदीपमध्ये अधिक चांगली फटकेबाजी करण्याची क्षमता आहे. कुलदीप हा यावर्षी एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने 11 सामन्यांमध्ये 22 बळी घेतले आहेत, तर अक्षरला 6 सामन्यांमध्ये फक्त 3 बळी मिळालेले आहेत. दुसरीकडे, पाकिस्तानचा लेगस्पिनर शादाबने यंदा 8 सामन्यांत 11 बळी घेतले असून फलंदाजीतही चांगली कामगिरी केली आहे.
संघ : भारत: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन (राखीव).
पाकिस्तान : बाबर आझम (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर झमान, इमाम-उल-हक, सलमान अली आगा, इफ्तिकार अहमद, मोहम्मद रिझवान, मोहम्मद हरिस, शादाब खान, मोहम्मद नवाज, उसामा मीर, फहीम अश्रफ, हरिस रौफ, मोहम्मद वसिम ज्युनियर, नसिम शाह, शाहीन आफ्रिदी, सौद शकील, तय्यब ताहिर (राखीव).
सामन्याची वेळ : दुपारी 3 वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, डिस्ने हॉटस्टार









