वृत्तसंस्था / नवी दिल्ली
2025 सालातील आयसीसीची चॅम्पियन करंडक क्रिकेट स्पर्धा पाकिस्तानमध्ये होत आहे. दरम्यान या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय संघाचे सामने संयुक्त अरब अमिरातमध्ये खेळविण्याची शक्यता वर्तविली जात आहे. स्पर्धेच्या वेळापत्रकानुसार भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपरिक संघातील सामना 23 फेब्रुवारीला होणार आहे.
सदर स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान भूषवित असले तरी ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलनुसार खेळविण्यास पीसीबीने आपली तयारी दर्शविली. त्यामुळे आता भारताच्या सामन्यासाठी संयुक्त अरब अमिरात या त्रयस्त ठिकाणाची निवड करण्यात आल्याचे जय शहा यांनी सांगितले. दरम्यान 2025 च्या चॅम्पियन करंडक क्रिकेट स्पर्धेवरील अनिश्चितेचे सावट या निर्णयामुळे दूर झाले आहे. 2008 नंतर भारतीय संघाने पाकचा दौरा केलेला नाही. उभय देशांतील राजकीय संबंध अधिक तणावग्रस्त असल्याने भारतीय शासनाने पाकमध्ये आपल्या संघाला खेळण्यास नकार दिला आहे. 2012-13 नंतर उभय संघातील द्विपक्षीय क्रिकेट मालिका आजपर्यंत झालेली नाही.
या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, बांगलादेश यांचा एकाच गटात समावेश आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना 20 फेब्रुवारीला, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना 2 मार्चला तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रविवार दि. 23 फेब्रुवारी रोजी खेळविला जाईल. भारताचे हे सर्व सामने दुबईमध्ये खेळविण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 19 फेब्रुवारीला या स्पर्धेला प्रारंभ होणार असून कराचीत यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात सलामीचा सामना होईल. पाक आणि बांगलादेश यांच्यातील सामना रावळपिंडीत 27 फेब्रुवारीला खेळविला जाईल. या स्पर्धेत अफगाण, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि द. आफ्रिका यांचा दुसऱ्या गटात समावेश आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या इतर संघांचे सामने लाहोर, कराची आणि रावळपिंडीत आयोजित केले आहेत. स्पर्धेतील दोन उपांत्य फेरीचे सामने 4 आणि 5 मार्चला होणार असून अंतिम सामना 9 मार्चला खेळविला जाईल. या अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी भारत पात्र ठरला तर त्यांचा सामना संयुक्त अरब अमिरातमध्ये होईल. पण भारता शिवाय इतर संघ पात्र ठरला तर हा उपांत्य सामना पाकिस्तानमध्ये होईल. अंतिम सामना लाहोरमध्ये होणार आहे. पण अंतिम फेरी गाठली तर हा अंतिम सामना संयुक्त अरब अमिरातमध्ये खेळविला जाईल, असे स्पर्धा आयोजकांकडून सांगण्यात आले.









