
लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. पीजेएस पन्नू (परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवापदक आणि विशेष सेवापदक विजेते) हे भारताच्या ‘मराठा लाईट इन्फंट्री’चे माजी कर्नल आहेत. त्यांनी लडाख येथे भारताच्या 14 व्या सैनिकी कमांडचे नेतृत्व केले आहे. ते ‘भारतीय संरक्षण सेवादला’चे उपप्रमुख होते. उपप्रमुख असताना त्यांनी ‘डिफेन्स स्पेस एजन्सी, डिफेन्स सायबर एजन्सी’, आणि ‘स्पेशल फोर्सेस डिव्हीजन’ची स्थापना केली. त्यांनी भारती विद्यापीठातून पीएचडी केलेली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील 2025 ची लढाई अल्पकालीन ठरली तरी अलीकडच्या इतिहासातील दोन अण्वस्त्रधारी शेजारी देशांमधील ती सर्वाधिक स्फोटक ठरली आहे.
काश्मीर प्रश्नामुळे असलेला प्रदीर्घ तणाव या संघर्षाचे मूळ कारण असला तरी 22 एप्रिल या दिवशी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेला क्रूर हल्ला हे त्याचे तत्कालिक निमित्त ठरले आहे. ज्यामुळे सामरिक आणि राजकीय संघर्षाची एक साखळीच सुरू झाली. पहलगाम हल्ल्यामध्ये 26 हिंदूंना मारण्यात आले. याचा हेतू भारतात धार्मिक फूट निर्माण व्हावी हा होता. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने तो अत्यंत पद्धतशीरपणे हाणून पाडला. पाकिस्तानच्या या चिथावणीला भारत सरकारने सडेतोड प्रत्युत्तर दिले. पंतप्रधान मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर हे नाव केवळ पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी नव्हे, तर पाकिस्तानची अप्रत्यक्ष युद्धाची क्षमता उद्ध्वस्त करण्यासाठी दिले. दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करणे आणि हल्ला झाल्यास जशास तसे प्रत्युत्तर देणे हा मर्यादित उद्देश या संघर्षाचा होता.
पहलगाम हल्ल्याचे निमित्त
जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या बैसारन खोऱ्यात पाकिस्तान समर्थित ‘द रेजिस्टन्स फ्रंट’ या दहशतवादी संघटनेने तेथे आलेल्या पर्यटकांवर क्रूर हल्ला केला. पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून ठार मारण्यात आले. ही दहशतवादी संघटना पाकिस्तानच्या ‘लष्कर ए तोयबा’ या कुविख्यात दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे. भारताने चोख पुराव्यानिशी या हल्ल्यासाठी पाकिस्तान समर्थित दहशतवादीच उत्तरदायी आहेत, असे प्रतिपादन केले. या हल्ल्याचा सूत्रधार पाकिस्तानच्या ‘स्पेशल फोर्स’चा माजी सदस्य हशीम मुसा हा होता, जो नंतर दहशतवादी झाला होता हे ही भारताने पुराव्यानिशी दाखवून दिले. या हल्ल्यात 25 भारतीय आणि एक नेपाळी नागरिक मारला गेला. हा संघर्ष दोन अण्वस्त्रधारी देशांमधील असल्याने त्याचे विशेष गांभीर्य होते.
भारताचे लष्करी आणि राजकीय प्रत्युत्तर
या निर्घृण हल्ल्याला भारताने आधी राजकीय पद्धतीने आणि नंतर लष्करी पद्धतीने प्रत्युत्तर दिले. प्रथम भारताने पाकिस्तानी मुत्सद्द्यांची हकालपट्टी केली. नंतर 1960 चा सिंधू जलवितरण करार स्थगित केला. तसेच दोन्ही देशांमधील नागरिकांची आवक-जावक बंद केली. याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने सिमला करार निलंबित ठेवला. भारताने आपले लष्करी प्रत्युत्तर 7 मे या दिवशी पाकव्याप्त काश्मिरातील आणि प्रत्यक्ष पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळांवर अचूक हल्ला करून दिले. भारताच्या या हल्ल्यात 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा झाला. युसूफ अजहर, अब्दुल मलीक रऊफ, मुदासिर अहमद अशा कुविख्यात दहशतवाद्यांना ठार करण्यात भारतीय लष्कराला यश आले. या हल्ल्यात भारताने ‘राफेल विमाने’ आणि ‘स्काल्प क्षेपणास्त्रां’चा वापर केल्याचे बोलले जाते. पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्याने प्रत्युत्तर दिले. परंतु भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीने त्याला यशस्वीपणे तोंड देऊन पाकिस्तानच्या हल्ल्याला निष्प्रभ केले. पाकिस्तानचे सर्व ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रे हवेतच उडविण्यात आपली वायुसंरक्षक यंत्रणा सक्षम ठरली.
भारताचे आणखी जोरदार हल्ले
भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केल्यामुळे चवताळलेल्या पाकिस्तानने भारतावर ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रांचा मारा सुरूच ठेवला. त्यामुळे भारताला पाकिस्तानवर आणखी जोरदार हल्ला करावा लागला. भारताने पाकिस्तानचे वायुदल, रडार यंत्रणा आणि ड्रोन्स डागण्याचे तळ यांना उद्ध्वस्त केले. भारतीय वायूदलाने अतुलनीय पराक्रमाचे प्रदर्शन करीत रफिकी मुरीद, चकलाला, रहिदयार खान, सुक्कूर, चुनियान, पसरूर आणि सियालकोट येथील पाकिस्तानचे महत्त्वाचे वायुतळ उद्ध्वस्त केले. याची घोषणा भारताच्या संरक्षण विभागाने शनिवारी सकाळी 10 वाजता एका विशेष पत्रकार परिषदेत केली. त्यानंतर अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. व्हान्स आणि परराष्ट्र व्यवहारमंत्री मार्को रुबियो यांनी शस्त्रसंधी घडवून आणण्यासाठी हस्तक्षेप केला. तथापि, ही शस्त्रसंधी अल्पजीवी ठरली. दोन्ही देशांनी एकमेकांवर शस्त्रसंधीचा भंग केल्याचा आरोप केला. पुन्हा पाकिस्तानकडून कुरापती काढणे सुरू झाल्यानंतर भारताने पूर्वीपेक्षाही जोरदार आणि विध्वंसक लष्करी प्रत्युत्तर दिले. या हल्ल्यात पाकिस्तानची वायू संरक्षण यंत्रणा आणि काही वायूतळ उद्ध्वस्त करण्यात आले. भारताने यशस्वीरित्या पाकिस्तानच्या वायू संरक्षण यंत्रणेचे आणि रडार यंत्रणेचे उद्ध्वस्तीकरण करून पाकिस्तानची हल्ला करण्याची क्षमता दाबून टाकली. लाहोर येथील वायूतळ आणि वायूसंरक्षण यंत्रणा तसेच रडार यंत्रणा निकामी करण्यात आली.
आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष वाढू लागल्याचे पाहताच आंतरराष्ट्रीय समुदायाने चिंता व्यक्त केली. अमेरिकेच्या प्रशासनाने आण्विक युद्ध होण्याची शक्यता बोलून दाखविली. तसेच संघर्ष नियंत्रणात आणण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी राजकीय प्रयत्न वेगवान केले. पाकिस्तानने केलेला शस्त्रसंधी भंग आणि त्यामुळे भारताने त्याला दिलेले चोख प्रत्युत्तर यामुळे संघर्ष थांबविण्याच्या प्रयत्नांना गती देण्यात आली. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांशी आम्ही अधिक प्रमाणात व्यापार वाढवू, अशी सवलत अमेरिकेकडून शांतता प्रस्थापनेच्या अटीवर देण्यात आली. असे असूनही सध्याची शांतता ही अस्थिर ठरण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांमधील प्रदीर्घ काळ चालत असलेला तणाव आणि आव्हाने पाहता सध्याची शस्त्रसंधी अल्पजीवी ठरण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे दीर्घकालीन शांततेसाठी सातत्यपूर्ण राजकीय संवाद आणि विश्व़ास निर्मितीच्या प्रयत्नांची, पुढील संघर्ष टाळण्यासाठी आवश्यकता आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर केलेले हल्ले आणि तणावात झालेली प्रचंड वाढ यामुळे दोन्ही देश एका मोठ्या सीमा संघर्षाच्या अगदी जवळ पोहोचल्याचे या संघर्षातून प्रतित झाले होते.
संघर्षाचे जागतिक परिणाम
या संघर्षामुळे विभागीय स्थैर्य आणि जागतिक बाजारपेठ यांच्या समोर धोका निर्माण झाला आहे. ऊर्जा मार्गामधील अडथळे आणि वाहतुकीच्या जहाजांच्या विमा रकमेतही वाढ झाल्याने जहाज वाहतूक महाग झाली आहे. त्यामुळे या संघर्षाबद्दल अधिक चिंता निर्माण झाली आहे. भारताला क्षेत्रीय महासत्ता बनण्याची महत्त्वाकांक्षा आहे. त्यामुळे तो स्वत:ला विभागीय संघर्षांमध्ये गुंतवून घेऊ इच्छित नाही.
भारताचा लाभ शांततेतच
पाकिस्तानचे तुकडे करणे किंवा पाकिस्तानची प्रशासकीय व्यवस्था उद्ध्वस्त करणे, यातून भारताला फारसे काही साध्य होणार नाही. कारण पाकिस्तानचे तुकडे झाल्यास प्रत्येक तुकडा स्वत:चे महत्त्व सिद्ध करण्यासाठी भारताच्याच हितांना धोका पोहोचविण्याची अधिक शक्यता आहे. तसे झाल्यास भारताच्या शत्रुंचाच लाभ होऊ शकतो. या उलट भारताने सशस्त्र संघर्ष टाळल्यास तो व्यापाराच्या माध्यमातून स्वत:ची अधिक प्रगती करू शकतो, तसेच सध्या चीन आणि अमेरिकेत सुरू असलेल्या व्यापार युद्धाचा लाभ उठविण्यासाठी प्रयत्न करू शकतो.
भारतासाठी धडा कोणता
भारताची सुरक्षा अबाधित राहण्यासाठी भारताने चीनला डोळ्यासमोर ठेवून आपली सामरिक आणि तंत्र वैज्ञानिक प्रगती साध्य करण्याची आवश्यकता आहे. हा धडा या संघर्षामुळे मिळाला आहे.
निष्कर्ष
भारत-पाकिस्तान संघर्ष केवळ प्रयोगासाठी (टार्गेट प्रॅक्टीस) होता का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या संघर्षात चिनी, पाश्चिमात्य आणि भारतीय युद्ध सामग्रीच्या गुणवत्तेचे आणि क्षमतेचे चांगलेच परीक्षण युद्धभूमीवरील स्थितीत झाले आहे. मात्र, हा 2025 चा संघर्ष भारत आणि पाकिस्तान यांच्या संबंधातील अस्थिरताही प्रगट करून गेला आहे. ऐतिहासिक समस्या आणि त्यांना मिळालेली तात्कालिक चिथावणीची जोड यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात त्वरित वातावरण तापू शकते. आणि लष्करी संघर्ष उद्भवू शकतो, हेही दिसून आले आहे. सध्याच्या शस्त्रसंधीमुळे संघर्ष थांबला असला तरी या संघर्षाची मूळ कारणे जशीच्या तशीच आहेत. त्यामुळे ही मूळ कारणे दूर करण्यासाठी दीर्घकालीन राजकीय प्रयत्नांची आवश्यकता आहे.









