वृत्तसंस्था/ जोहर बेहरु, मलेशिया
सुल्तान जोहर चषक कनिष्ठ पुरुषांच्या हॉकी स्पर्धेत शुक्रवारी खेळवण्यात आलेल्या चुरशीच्या सामन्यात माजी विजेत्या भारतीय कनिष्ठ हॉकी संघाने पाकला 3-3 असे गोलबरोबरीत रोखले.
या सामन्यात दोनवेळा पाकने भारतावर आघाडी घेतली होती. या सामन्यात भारतातर्फे अमनदीप लाक्राने 30 व्या मिनिटाला, आदित्य अर्जुन लालगेने 56 व्या मिनिटाला तर उत्तम सिंगने 59 व्या मिनिटाला गोल केले. पाकतर्फे अरबाज अहमदने 31 व्या आणि 58 व्या मिनिटाला असे दोन गोल नोंदवले तर अब्दुल शाहीदने 49 व्या मिनिटाला एक गोल केला. या स्पर्धेतील हा सलामीचा सामना होता. हा सामना अनिर्णित राहिल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. येत्या डिसेंबर महिन्यात मलेशियात होणाऱ्या पुरुषांच्या कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेपूर्वीची ही महत्त्वाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. शुक्रवारच्या सामन्यात गोल करण्याच्या अनेक संधी पूर्वार्धात वाया घालवल्या. सामना संपण्यास केवळ एक मिनिट बाकी असताना उत्तम सिंगने मैदानी गोल करून भारताला बरोबरी साधून दिली. आता या स्पर्धेत भारताचा पुढील सामना यजमान मलेशियाबरोबर शनिवारी खेळवला जाणार आहे.









