लढतीचे ठिकाण हलवण्यास पाकचा नकार
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
डेव्हिस चषक विश्व गट 1 प्ले ऑफ लढतीचा ड्रॉ काढण्यात आला असून या ड्रॉनुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा लढत होणार आहे. या लढतीचे यजमानपद पाकला मिळाले आहे. मात्र यावेळी सदर लढत त्रयस्थ ठिकाणी हलवण्यास पाक टेनिस फेडरेशनने स्पष्ट नकार दिला आहे. 2019 साली डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया ओसेनिया गट 1 मधील लढत ड्रॉनुसार काढण्यात आली होती पण सुरक्षा समस्येवरून ही लढत त्रयस्थ ठिकाणी म्हणजेच कझाकस्तानमध्ये हलवण्यात आली होती. दरम्यान या लढतीचे ठिकाण हलवल्याने या निर्णयाच्या निषेधार्थ पाकचे तत्कालिन अव्वल टेनिसपटू ऐसाम उल हक कुरेशी आणि अकील खान यांनी सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्या लढतीमध्ये पाकचे मोहमद शोएब, हुझैफा अब्दुल रेहमान आणि युसुफ खलिल यांना पाक टेनिस फेडरेशनने उतरवले होते. 2019 च्या लढतीमध्ये भारताने दुबळ्या पाकिस्तानचा 4-0 असा एकतर्फी पराभव केला होता. डेव्हिस चषक स्पर्धेच्य्या लढतीत पाकच्या खेळाडूंनी आता केवळ सात गेम्स जिंकले आहेत. आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने 2019 ची लढत त्रयस्थ ठिकाणी हलवण्याला आपली मान्यता दिली होती. मात्र यावेळी अकिल भारतीय टेनिस संघटनेला आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनच्या विश्व नियंत्रण समितीला भारत-पाक या आगामी लढतीच्या ठिकाणामध्ये बदल करून ही लढत त्रयस्थ ठिकाणी घेण्याबाबत विविध समस्या पटवून द्याव्या लागतील. मात्र यावेळी भारतीय डेव्हिस चषक संघ या स्पर्धेच्या ड्रानुसार पाकमध्ये खेळण्यासाठी येईल तसेच आम्हाला या लढतीचे यजमानपद स्वीकारण्याची संधी मिळेल अशी आशा पाकचा अनुभवी टेनिसपटू अकील खानने वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केली आहे. पाक संघाने गेल्या आठवड्यात डेव्हिस चषक स्पर्धेच्या विश्व गट 2 लढतीमध्ये इंडोनेशियाचा 4-0 असा पराभव केला होता. त्यामुळे आता भारत-पाक डेव्हिस चषक लढत पाकमध्ये खेळवली जाईल अशी आशा कुरेशीने व्यक्त केली आहे.
भारतीय डेव्हिस संघाने या लढतीसाठी पाकमध्ये जाणे पसंत केले तर तो एक नवा इतिहास घडेल. तसेच तब्बल 59 वर्षानंतर भारतीय डेव्हिस चषक संघ सरहद्द ओलांडून पहिल्यांदाच पाकमध्ये प्रवेश करेल असे पाक टेनिस संघटनेचे अध्यक्ष सलिम सैफुल्ला खान यांनी म्हटले आहे. भारतीय डेव्हिस संघाने यापूर्वी म्हणजे 1964 साली पाकचा दौरा केला होता आणि त्या दौऱ्यातील लढतीत भारताने यजमान पाकिस्तानचा 4-0 सा पराभव केला होता. रामनाथन कृष्णन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पाकमध्ये ही लढत खेळली होती. पाकने आतायपर्यंत डेव्हिस चषक लढतीसाठी तीनवेळा भारताचा दौरा केला आहे. उभय देशामध्ये आतापर्यंत आठवेळा डेव्हिस लढती झाल्या असून भारताने एकदाही लढत गमवलेली नाही. जर भारताने या लढतीसाठी पाकमध्ये येण्यास नकार दर्शवला तर आम्ही त्रयस्थ ठिकाणी खेळणार नाही असे स्पष्टीकरण पाक टेनिस फेडरेशनच्या प्रमुखांनी केले आहे. सदर लढत फेब्रुवारी मार्चदरम्यान होणार असून या लढतीवेळी इस्लामाबादमधील हवामानही चांगले असते असेही त्यांनी सांगितले.









