आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर : सहा संघांचा सहभाग : पाकिस्तान व लंकेत होणार सामने
वृत्तसंस्था/ लाहोर
श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये खेळल्या जाणाऱ्या आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. 30 ऑगस्टपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून 17 सप्टेंबर रोजी अंतिम सामना खेळवला जाईल. दरम्यान, कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2 सप्टेंबर रोजी क्रिकेटचा थरार पाहायला मिळणार आहे. हा सामना हा सामना श्रीलंकेमधील कँडी येथील मैदानात खेळवला जाईल. बुधवारी सायंकाळी पीसीबीचे अध्यक्ष झाका अश्रफ यांनी आशिया चषकाचे वेळापत्रक जारी केले.
पाकिस्तान आणि नेपाळ यांच्या सामन्याने आशिया चषकाची सुरुवात होणार असून हा सामना पाकिस्तानमधील मुलतान येथे होईल. आशिया चषकाचे एकूण 13 सामने होणार आहेत. यापैकी चार सामने पाकिस्तानमध्ये तर 9 सामने श्रीलंकेमध्ये होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
आशिया चषक स्पर्धेच्या आयोजनाविषयी बऱ्याच दिवसापासून वाद सुरु आहे. सुरुवातील पाकिस्तान या स्पर्धेचा आयोजक असल्यामुळे बीसीसीआयने पाकमध्ये जाण्यास नकार दिला होता. यानंतर पीसीबीचे माजी अध्यक्ष नजीम सेठी यांच्या नेतृत्वाखाली हायब्रीड मॉडेलचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या प्रस्तावला सहभागी देशांच्या बोर्डांनी मान्यता दिली. यानुसार टीम इंडियाचे सर्व सामने श्रीलंकेत खेळवले जातील तसेच भारत अंतिम सामन्यात पोहोचला तर अंतिम सामना देखील लंकेत खेळवला जाईल. यानंतर बुधवारी सायंकाळी आशियाई क्रिकेट परिषद व पीसीबीने स्पर्धेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले. पाकिस्तान वि नेपाळ सामन्याने स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. 17 सप्टेंबर रोजी कोलंबो येथे या स्पर्धेची फायनल होणार आहे. विशेष म्हणजे, आगामी वनडे विश्वचषक स्पर्धा पाहता यंदाची आशिया चषक स्पर्धा यावर्षी 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे.
सहा संघांचा सहभाग, भारत खेळणार दोन सामने
यंदाची आशिया चषक स्पर्धा भारत, श्रीलंका, अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेश या सहा संघात होणार आहे. नेपाळ, पाकिस्तान आणि भारत हे गट अ मध्ये तर श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे गट ब मध्ये आहेत. दरम्यान, टीम इंडियाचा पहिला सामना 2 सप्टेंबर रोजी कँडी येथे पाकिस्तान विरुद्ध तर दुसरा सामना 4 सप्टेंबर रोजी नेपाळ विरुद्ध कँडी येथे होईल.
आशिया चषक 2023 चे संपूर्ण वेळापत्रक (ग्रुप स्टेज)
30 ऑगस्ट – पाकिस्तान वि. नेपाळ (मुलतान, पाकिस्तान)
31 ऑगस्ट – बांगलादेश वि. श्रीलंका (कँडी, श्रीलंका)
2 सप्टेंबर – पाकिस्तान वि. भारत (कँडी, श्रीलंका)
3 सप्टेंबर – बांगलादेश वि. अफगाणिस्तान (लाहोर, पाकिस्तान)
4 सप्टेंबर – भारत वि. नेपाळ (कँडी, श्रीलंका)
5 सप्टेंबर- अफगाणिस्तान वि. श्रीलंका (लाहोर, पाकिस्तान)
सुपर फोरमधील लढती-
(अ गटातील पहिला व दुसरा संघ, ब गटातील पहिला व दुसरा संघ)
6 सप्टेंबर- अ 1 विरुद्ध ब 2, (लाहोर, पाकिस्तान)
9 सप्टेंबर- ब 1 विरुद्ध ब 2, (कोलंबो, श्रीलंका)
10 सप्टेंबर- अ 1 विरुद्ध अ 2, (कोलंबो, श्रीलंका)
12 सप्टेंबर- अ 2 विरुद्ध ब 1, (कोलंबो, श्रीलंका)
14 सप्टेंबर- अ 1 विरुद्ध ब 1, (कोलंबो, श्रीलंका)
15 सप्टेंबर- अ 2 विरुद्ध ब 2, (कोलंबो, श्रीलंका)
अंतिम सामना
17 सप्टेंबर – सुपर फोरमधील पहिला संघ वि. दुसरा संघ (कोलंबो, पाकिस्तान)









