चिनी नागरिकांना व्हिसा दिला जाणार : पाच वर्षांपूर्वी गलवान संघर्षानंतर सेवा बंद
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
चीनच्या नागरिकांना भारताचा व्हिसा देण्यास पुन्हा प्रारंभ करण्यात येणार आहे, अशी घोषणा भारताकडून करण्यात आली आहे. ही व्हिसा प्रक्रिया आज गुरुवारपासून कार्यरत केली जाणार आहे. हा पर्यटन व्हिसा असेल. 2020 मध्ये लडाखमधील गलवान येथे भारत आणि चीन यांच्या सैनिकांमध्ये हिंसक संघर्ष झाला होता. त्या संघर्षात भारताचे 20 सैनिक हुतात्मा झाले होते. तर चीनच्याही अनेक सैनिकांना प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर भारताने चीनच्या नागरिकांना भारतात पर्यटनासाठी व्हिसा देण्याच्या प्रक्रियेला स्थगिती दिली होती.
अलिकडच्या काळात भारत आणि चीन यांनी तणाव कमी करून संबंध सुधारण्याच्या दिशेने पावले टाकण्यास प्रारंभ केला आहे. लडाखमध्ये दोन्ही देशांच्या सेना एकमेकींसमोर आल्याने निर्माण झालेला आणि जवळपास चार वर्षे टिकलेला तणाव निवळण्यासाठी दोन्ही देशांनी पावले उचलली आहेत. लडाखमधील संघर्ष बिंदूंवरून दोन्ही देशांच्या सेना त्यांच्या मूळच्या स्थानी परतल्या आहेत. अशा स्थितीत भारताने पुन्हा ही व्हिसा प्रक्रिया पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे.
चीनकडूनही प्रयत्न
भारताची सतत संपर्क ठेवण्यास आणि विविध मुद्द्यांवर सातत्याने चर्चा करण्यास चीन सज्ज आहे. भारताशी आम्हाला चांगले संबंध हवे आहेत. लडाखमधील तणावर दोन्ही देशांनी प्रयत्नपूर्वक आटोक्यात आणला आहे. आता भारताने चिनी नागरिकांना व्हिसा देण्यास प्रारंभ केल्याची घोषणा केल्याने आज गुरुवारपासून चिनी नागरिक भारताच्या पर्यटन व्हिसासाठी आवेदनपत्र सादर करू शकतील, असे प्रतिपादन चीनच्या प्रशासनाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी स्पष्ट केले आहे.
नागरी विमानसेवेचाही पुनरारंभ
भारताने जानेवारी 2025 पासून चीनसाठी नागरी विमानसेवेलाही अनुमती दिली आहे. त्यामुळे आता भारतीय प्रवासी विमाने चीनमध्ये जाऊ शकत आहेत. सीमावादावर अजून स्थायी तोडगा निघाला नसला, तरी सीमेवर तणाव निर्माण होणे टाळण्यासाठी प्रयत्न करण्याचे दोन्ही देशांनी ठरविलेले आहे. भारताचे विदेश व्यवहार सचिव विक्रम मिसरी यांनी चीनचा दौराही केला होता. भारताचे विदेश व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनीही नुकताच चीनचा दौरा करून चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची भेट घेतली होती. सध्याच्या जागतिक परिस्थितीत दोन्ही देशांनी एकमेकांना सहकार्य करण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते.









