ऑलिम्पिकमधील पुरुष हॉकीचा ड्रॉ जाहीर
वृत्तसंस्था/ लॉसेन, स्वित्झर्लंड
येत्या जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या पुरुष हॉकी संघाची सलामीची लढत न्यूझीलंडविरुद्ध 27 जुलै रोजी होणार आहे. या स्पर्धेतील हॉकीचे वेळापत्रक बुधवारी जाहीर करण्यात आले.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने कांस्यपदक मिळविले होते. यावेळी त्यांचा ब गटात समावेश करण्यात आला असून 29 जुलै रोजी अर्जेन्टिना, 30 जुलै रोजी आयर्लंड, 1 ऑगस्ट रोजी बेल्जियम व 2 ऑगस्ट रोजी ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध भारताचे पुढील सामने होतील. गट अ मध्ये नेदरलँड्स, स्पेन, जर्मनी, फ्रान्स, ग्रेट ब्रिटन, दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. 4 ऑगस्ट रोजी उपांत्यपूर्व, 6 ऑगस्ट रोजी उपांत्य तर कांस्यपदकाची व जेतेपदाची लढत 8 ऑगस्ट रोजी होणार आहे.
येथे आयोजित केलेल्या एका समारंभात हॉकी स्पर्धेचा ड्रॉ जाहीर करण्यात आला. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे प्रमुख थॉमस बाक, एफआयएच अध्यक्ष तय्यब इक्रम यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या स्पर्धेतील हॉकीचे सामने कोलंबसमधील वायवेस डु मॅनोर स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहेत. पुरुष हॉकीमध्ये बेल्जियम विद्यमान ऑलिम्पिक सुवर्णविजेते आहेत.









