वृत्तसंस्था/नवी दिल्ली
2024 च्या बॅडमिंटन हंगामातील येथे मंगळवारपासून इंडिया खुल्या सुपर 750 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांच्याकडून दुहेरीत पदकाची अपेक्षा बाळगली जात आहे.
सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या भारतीय बॅडमिंटनपटूंनी 2023 च्या बॅडमिंटन हंगामात 6 अजिंक्यपदे मिळविली आहेत. तर नुकत्याच झालेल्या मलेशिया सुपर 1000 दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धेत या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. 2022 साली झालेल्या या स्पर्धेत पुरूष दुहेरीत सात्विक-चिराग तसेच लक्ष्यसेन यांनी भारताला पदके मिळवून दिली होती. गेल्या वर्षी द्वितीय मानांकित जोडी सात्विक आणि चिराग यांना दुखापती समस्येमुळे पहिल्या फेरीअखेरच स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. मंगळवारपासून सुरू होणाऱ्या इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक आणि चिराग यांचा पुरूष दुहेरीतील सलामीचा सामना तैपेईच्या फेंग जेन ली आणि फेंग ची ली यांच्या बरोबर होणार आहे.
या स्पर्धेमध्ये पुरूष एकेरीत भारताच्या एच. एस प्रणॉय, लक्ष्यसेन आणि किदांबी श्रीकांत यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. किदांबी श्रीकांतने गेल्या आठवड्यात जोनाथन ख्रिस्टिवर विजय मिळविल्याने त्याचा आत्मविश्वास निश्चितच वाढला होता. एच. एस. प्रणॉयचा सलामीचा सामना चीन तैपेईच्या चोयु चेन बरोबर तर लक्ष्यसेनचा सलामीचा सामना भारताच्या प्रियांषु राजवत बरोबर होणार आहे. 2012 पासून या स्पर्धेला भारतात प्रारंभ झाला. यावेळी या स्पर्धेत महिला दुहेरीत अश्विनी पोनापा आणि तनिषा क्रेस्टो, गायत्री गोपीचंद व ट्रेसा जॉली भारताचे प्रतिनिधित्व करीत आहेत. डेन्मार्कचा टॉप सिडेड बॅडमिंटनपटू व्हिक्टर अॅक्सलसनने प्रकृती नादुरूस्तीमुळे या स्पर्धेतून माघार घेतली आहे. दरम्यान त्याने आपला सहभाग गेल्या आठवड्यात मलेशिया बॅडमिंटन स्पर्धेत दर्शविला होता.









