भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोने बुधवारी संध्याकाळी इतिहास घडविला आहे. या संस्थेने हाती घेतलेले चांद्रयान-3 हे अभियान शतप्रतिशत यशस्वी ठरले. ही उपलब्धी भारताला अवकाश क्षेत्रात जागतिक महत्त्व मिळवून देणारी तर आहेच, पण विज्ञानाच्या अन्य क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या संशोधकांचा, शास्त्रज्ञांचा आणि तंत्रज्ञांचा उत्साह वाढविणारी आहे. या यशाचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच आहे. विशेषत: यापूर्वीचे असेच अभियान अपयशी ठरल्यानंतर खचून न जाता त्या अपयशाचेच संधीत रुपांतर करण्याचा जो निर्धार या संस्थेने प्रदर्शित केला त्याला खरोखरच तोड नाही. आपले नेमके कोठे चुकले याचा शांतचित्ताने शोध घेऊन आणि त्या चुका सुधारुन पुढच्यावेळी यशस्वी होणे ही बाब सांगावयास सोपी असली तरी प्रत्यक्ष कृतीत आणावयास अवघड अशीच होती. पण या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी हे जटील आव्हान ज्या प्रकारे पेलले त्यावरुन भारत अंतराळ क्षेत्रात याहीपेक्षा अधिक मोठी आव्हानं यशस्वीरित्या पार करुन दाखवेल हा आत्मविश्वास आता सर्वसामान्यांमध्येही निर्माण झाला आहे. भारताने चांद्रअभियान हाती घेतले तेव्हा अनेकांनी अनेक शंका उपस्थित केल्या होत्या. भारताला हे जमेल का, येथपासून याची आवश्यकताच काय आहे, यासाठी इतका पैसा भारतासारख्या गरीब देशाने का खर्च करायचा, अपयश हाती लागले तर काय, असे अनेक मुद्दे या ‘शंकासुरां’नी उपस्थित केले होते. तथापि, त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन भारताच्या शास्त्रज्ञांनी आपले कार्य पुढे सुरु ठेवले. देशाच्या सरकारनेही त्यांना प्रोत्साहन दिले तसेच आर्थिक साहाय्याची व्यवस्थाही केली. अमेरिकेतील काही प्रसिद्ध वृत्तपत्रांनी तर चांद्रअभियानाची थट्टा केली होती. तशा प्रकारची व्यंगचित्रेही प्रसिद्ध केली होती. आज याच ‘थट्टाकारां’वर भारताची तोंड भरुन प्रशंसा करण्याची वेळ आली आहे. ‘अंतराळ क्षेत्रात आणि या अभियानात भारताचा भागीदार असल्याचा आम्हाला अभिमान आणि आनंद आहे, ही अमेरिकेची प्रतिक्रिया बोलकी आहे. आज आंतरराष्ट्रीय क्षेत्रात भारताला कधी नव्हे इतके महत्त्व प्राप्त होत आहे. यासाठी जागतिक राजकीय आणि आर्थिक परिस्थिती कारणीभूत आहेच पण भारताने गेल्या काही वर्षांमध्ये केलेल्या प्रगतीचेही योगदान नि:संशय कारणीभूत आहे. अशा स्थितीत इस्रोचे हे यश भारताचे महत्त्व जागतिक पटलावर अधिकच वाढविणारे ठरणार आहे. आपण केवळ जगाच्या स्पर्धेत असून चालत नाही. काहीतरी भव्यदिव्य ‘करुन’ दाखविल्याशिवाय आपल्याला जग किंमत कशी देणार? त्यादृष्टीने हे यश महान आहे. अनेक देशांनी चंद्रस्पर्श केला आहे. आपणही केला तर त्यात एवढे हुरळून जाण्यासारखे काय आहे, असा नकारात्मक प्रश्न विचारण्यात अर्थ नाही. कारण एकतर कोणीही हुरळून गेलेले नाहीत. उलट, पुढील अंतराळ अभियाने अधिक जोमाने करण्याचा उत्साह यामुळे मिळालेला आहे. एखादे मोठे यश साजरे करणे, म्हणजे गर्वोन्नत होणे नव्हे. ‘सेलिब्रेशन’ करण्याची माणसाची वृत्ती नैसर्गिक असते. काही तथाकथित पुरोगाम्यांच्या या संबंधातील प्रतिक्रिया पाहिल्यास त्यांच्या पोटात काय खदखदत आहे, याची कल्पना येते. इस्रो या संस्थेचा प्रारंभ भारताचे पहिले पंतप्रधान नेहरु यांनी केला असे खोचकपणे सांगण्यात येत आहे. पण ही वस्तुस्थिती कोणी नाकारली आहे काय? आणि केवळ संस्थेचा प्रारंभ करुन काम भागत नाही. संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होत राहिली पाहिजे. प्रत्येक सरकारने त्यासाठी त्यांचे भरीव योगदान दिले पाहिजे. इस्रोचे अंतराळ संशोधनातील ट्रॅक रेकॉर्ड नेहमीच कौतुकास्पद राहिले आहे. नेहरुंनी स्थापन केलेल्या या संस्थेला नंतरच्या सरकारांनी जितके साहाय्य केले त्याहीपेक्षा जास्त सध्याच्या सरकारने केलेले आहे. सहसा एक अभियान अपयशी झाल्यानंतर त्याच अभियानासाठी पुन्हा पैसा उपलब्ध करुन देणे टाळले जाते. देशाची आर्थिक परिस्थिती, गरीबी इत्यादी कारणे पुढे केली जातात. पण या सरकारने तसे काही न करता पुन्हा नव्याने आर्थिक तरतूद केली. हेही महत्त्वाचे आहे, आणि त्याचे श्रेय या सरकारला दिले पाहिजे. या यशाचा लाभ पंतप्रधान मोदी निवडणुकीच्या काळात उठवतील अशी एक (काल्पनिक) धास्ती या कथित पुरोगाम्यांना भेडसावत असावी असे एकंदर त्यांच्या प्रतिक्रियांवरुन जाणवते. हे आत्मविश्वास गमावल्याचे लक्षण आहे. एखाद्या सरकारच्या काळात जेव्हा काही भरीव आणि लाभदायक कामगिरी केली जाते, तेव्हा त्याला काही प्रमाणात राजकीय रंग प्राप्त होणे क्रमप्राप्त असते. पंतप्रधान मोदींचे टीकाकार जेव्हा सत्तेत होते, तेव्हा त्यांनीही अशा प्रकारचे श्रेय घेतलेले नाही काय? भारताने केलेली पहिली अणुचाचणी, बांगला देशच्या स्वातंत्र्यासाठीचे युद्ध, किंवा अवकाश क्षेत्रासंबंधीच बोलायचे तर अंतराळवीर राकेश शर्मा यांचा रशियाच्या यानातून झालेला अंतराळ प्रवास या बाबी त्या त्या काळात राजकीय श्रेयवादाचे विषय बनलेल्या नव्हत्या काय? त्यामुळे आत्ताच एवढे नाकाने कांदे सोलायचे कारण नाही. असे धाडसी निर्णय घेणाऱ्या तत्कालीन नेतृत्वाचे तोंड फाटेपर्यंत कौतुक करणारे भाटचारण त्या काळांमध्येही होते. असे घडणे नैसर्गिक असते. त्याला फार महत्त्व देण्याचे कारण नाही. काही कथित बुद्धीवाद्यांनी चांद्रअभियानाच्या संदर्भात विज्ञानवाद विरुद्ध देवधर्मश्रद्धा अशी वात पेटविण्याचाही कुत्सीत आणि संकुचित प्रयत्न केला आहे. एखादे अभियान, मग ते शुद्ध वैज्ञानिक असले तरी ते यशस्वी व्हावे म्हणून कोणी देवाची प्रार्थना किंवा पूजाआर्चा केली तर असे काय आकाश कोसळते? एरवी, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारणारे पुरोगामी अशा प्रार्थनांची जेव्हा चेष्टा करतात, तेव्हा त्यांचे अंतरंग उघड होते. त्यांना धर्म किंवा देव यांच्या विरोधात विज्ञानाचा उपयोग शस्त्र म्हणून करण्याची भारी हौस आहे. पण सर्वसामान्यांना दोन्ही हवे असते आणि तसे हवे असल्याचा त्यांना अधिकारही आहे. त्यामुळे उगाचच राईचा पर्वत करण्यात अर्थ नाही. त्यातून कोणतीही विज्ञाननिष्ठा सिद्ध होत नाही. असो. बुधवारचा दिवस भारतासाठी अत्यानंदाचा होता ही बाब महत्त्वाची. तेव्हा इस्रोला पुढील अभियानांसाठी शुभेच्छा देणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.
Previous Articleधामापूरचा पुरातत्वीय आणि नैसर्गिक वारसा
Next Article कावेरीचे पाणी पुन्हा पेटणार?
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








