लवकरच व्यापक व्यापार करार शक्य : केंद्रीय मंत्र्यांनी राज्यसभेत दिली माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत आणि ओमानदरम्यान व्यापक व्यापार करारासाठी चर्चा पूर्ण झाली आहे. केंद्र सरकारने राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरादाखल ही माहिती दिली आहे. भारत आणि ओमान यांच्यात व्यापार करारावर 2023 मध्ये चर्चा सुरू झाली होती. वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितिन प्रसाद यांनी राज्यसभेत काँग्रेस खासदार हेबी माथेर हिशाम यांच्याकडून विचारण्यात आलेल्या लेखी प्रश्नाच्या उत्तरादाखल ‘भारत-ओमान व्यापक आर्थिक भागीदारी करारावर (सीईपीए) चर्चा पूर्ण झाली’ असल्याचे सांगितले आहे.
भारत आणि ओमानदरम्यान मैत्री आणि सहकार्याचा एक जुना इतिहास आहे. हे संबंध परस्पर विश्वास आणि सन्मानाच्या पायावर टिकलेले आहेत आणि शतकांपासून दोन्ही देशांच्या लोकांदरम्यान मजबूत संबंध राहिले आहेत. दोन्ही देश रणनीतिक भागीदार असून 1955 मध्ये राजनयिक संबंध प्रस्थापित झाल्यापासून दोन्ही देशांदरम्यान व्यापार आणि गुंतवणूक सातत्याने बहरत आहे. द्विपक्षीय संबंधांना 2008 साली रणनीतिक भागीदारीत बदलण्यात आले होते असे जितिन प्रसाद यांनी सांगितले आहे. परंतु सरकारने ओमानसोबत मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी कधी करण्यात येणार हे मात्र सध्या सांगितलेले नाही.
5 वर्षांमध्ये अनेक देशांसोबत करार
भारताने मागील 5 वर्षांमध्ये स्वत:च्या व्यापार संबंधांना मजबूत केले असून यादरम्यान अनेक मुक्त व्यापार करारांवर स्वाक्षरी करण्यात आली आहे. तसेच अनेक नव्या करारांवर चर्चा सुरू आहे. यात 2021 मध्ये लागू भारत-मॉरिशस व्यापक आर्थिक सहकार्य आणि भागीदारी करार, 2022 मध्ये भारत-युएई व्यापक आर्थिक भागीदारी करार आणि भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य अन् व्यापार करार, 2025 मध्ये भारत-ब्रिटन व्यापक आर्थिक आणि व्यापार करार सामील असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले.
युरोपीय महासंघासोबत चर्चा सुरू
भारत-युरोपीय महासंघ मुक्त व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार चालू वर्षाच्या अखेरपर्यंत लागू होण्याची अपेक्षा आहे. याचबरोबर भारत अनेक करारांवर चर्चा करत आहे. यात भारत-ऑस्ट्रेलिया व्यापक आर्थिक सहकार्य करार, भारत-श्रीलंका आर्थिक अन् तंत्रज्ञान सहकार्य करार, भारत-पेरू मुक्त व्यापार करार, भारत-चिली मुक्त व्यापार करार, भारत-न्युझीलंड मुक्त व्यापार करार आणि अमेरिकेसोबत एक द्विपक्षीय व्यापार करार सामील आहे.









